नाशिक : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 8 जूनपासून पुन्हा एकदा उपोषण (Hunger Strike) सुरु केले. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. जरांगेंची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचारासाठी नकार दिला आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकला सकल मराठा समाजाने (Sakal Maratha Samaj) आपली भूमिका पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली.  


यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक करण गायकर म्हणाले की, लोकसभा निवडणूका (Lok Sabha Election 2024) झाल्यानंतर मराठा समाजाच्या मागणीसाठी जरांगे पाटील उपोषण करत आहे. नाशिक जिल्हा त्यांच्या पाठीमागे उभा आहे. आम्हीही या लढ्यात सहभागी होत आहोत. आमदार आणि खासदार यांना सकल मराठा समाजाची विनंती आहे की, नवनिर्वाचित खासदारांनी तात्काळ अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांना आपल्या लेटर पॅडवर पाठिंबा द्यावा. मनोज जरांगे पाटील यांना आपण जर पाठिंबा देणार नसाल तर तुम्ही मतदारसंघात कसे फिरणार तेच बघतो, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 


...तर आमचे पहिले उपोषण हे शरद पवार यांच्या घरापासून 


ते पुढे म्हणाले की, सकल मराठा समाज शरद पवार (Sharad Pawar) यांना विनंती करतो की, आपण पक्ष फुटल्यानंतर महाविकास आघाडीचा जसे नेतृत्व केले, तसे आपण मराठा आरक्षणासाठी आपण सर्व पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांना सोबत घ्यावे. अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन महाराष्ट्राला मार्गदर्शन करावे. शरद पवार यांनी जर आमच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊन मार्ग सोडवला तर आम्ही सर्व मराठा समाज आपल्यासोबत राजकीयदृष्ट्या सक्रिय राहू. आम्हाला जर आपण पाठिंबा देणार नसेल तर आम्ही राज्यभर लाक्षणिक उपोषण करू आणि आमचे पहिले उपोषण हे शरद पवार यांच्या घरापासून असेल, असा इशारा यावेळी करण गायकर यांनी दिला आहे.  


...तर आम्ही पुढील भूमिका घेणार


पुढील दोन दिवसांत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सोडविले नाही तर आम्ही पुढील भूमिका घेऊ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला तरी चालेल. सरकारने जरांगे पाटील यांना फसवलं आहे.  सगेसोयरेची फसवणूक झाली आहे. लोकसभेत मराठा समाजाचा फटका बसलाय की नाही याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आत्मपरीक्षण करावे. आमच्या मागण्यांचा विचार करावा, अजूनही वेळ गेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो, असं समजू नका, भुजबळांचा दावा; मनोज जरांगे म्हणतात, थोडं थांबा कळेल!