Nashik Vadhvan Expressway : आनंदाची बातमी! नाशिक थेट वाढवण बंदराशी जोडले जाणार, फ्रेट कॉरिडॉर’ महामार्ग प्रकल्पाला मान्यता, औद्योगिक आणि शेती विकासासाठी 'गोल्डन रूट' ठरणार
Nashik Vadhvan Expressway : नाशिक जिल्ह्याला पालघरमधील वाढवण बंदराशी थेट जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी इगतपुरी-वाढवण एक्स्प्रेसवे आणि ‘फ्रेट कॉरिडॉर’ महामार्ग प्रकल्पाला राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे.

Nashik Vadhvan Expressway : नाशिक (Nashik) जिल्ह्याला पालघरमधील (Palghar) वाढवण बंदराशी (Vadhvan Port) थेट जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी इगतपुरी-वाढवण एक्स्प्रेसवे आणि ‘फ्रेट कॉरिडॉर’ महामार्ग प्रकल्पाला राज्य सरकारने (Maharashtra Government) तत्त्वतः मान्यता दिली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) केली जाणार आहे.
वाढवण बंदर (तवा) ते समृद्धी महामार्गावरील भरवीर इंटरचेंजदरम्यान सुमारे 104.898 किलोमीटर लांबीच्या फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्पासाठी एकूण 2,528.90 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, यामध्ये अंदाजित 1,500 कोटी रुपये भूसंपादनासाठी आणि 1,028.90 कोटी रुपये संभाव्य व्याजासाठी खर्च होणार आहे.
छगन भुजबळांकडून पाठपुरावा (Chhagan Bhujbal)
या प्रकल्पासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. भुजबळ यांनी 24 मार्च 2025 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि 6 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकल्पाला मान्यता देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने प्रकल्पास मंजुरी दिली आहे. भुजबळ यांनी नाशिक-वाढवण एक्स्प्रेसवे आणि नाशिक-वाढवण रेल्वेमार्ग हे दोन्ही प्रकल्प परस्पर समन्वयाने राबवावेत, अशी शिफारस राज्य सरकारकडे केली होती. त्यामुळे केवळ रस्ते नव्हे, तर रेल्वेद्वारेही बंदराशी दळणवळण शक्य होणार असून, हा एक समन्वित वाहतूक प्रकल्प ठरणार आहे.
हुडकोकडून कर्ज घेणार
या प्रकल्पासाठी हुडको (HUDCO) कडून कर्ज घेण्यात येणार असून, त्या कर्जासाठी राज्य सरकार आवश्यक हमी देणार आहे. यामुळे प्रकल्पाच्या आर्थिक स्थैर्याला बळ मिळणार आहे. पुढील टप्प्यांत अंमलबजावणी वेगात पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय मंजुऱ्याही दिल्या जाणार असल्याचे मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केले.
औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय संधी
या निर्णयामुळे नाशिक जिल्हा, मराठवाडा, विदर्भ तसेच इतर अंतर्गत भागातील औद्योगिक व कृषी उत्पादनांची थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणी होणार आहे. वाढवण बंदर हे भारतातील सर्वात खोल आणि आधुनिक सागरी टर्मिनलपैकी एक असणार असून, ते ‘आयएमईईसी’ (IMEEC) आणि ‘आयएनएसटीसी’ (INSTC) या आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गांशी थेट जोडले जाणार आहे. या माध्यमातून केवळ वाहतूक खर्चात बचत होणार नाही, तर मालवाहतुकीची गतीही वाढणार आहे. परिणामी, महाराष्ट्रातील औद्योगिक, आर्थिक आणि पायाभूत विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नाशिकचे देशव्यापी आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढणार
या प्रकल्पांमुळे नाशिक शहर हे एक महत्त्वाचे लॉजिस्टिक हब म्हणून उदयास येईल. वाढवण बंदराशी थेट जोडणी झाल्याने शहराचा औद्योगिक चेहरा बदलण्याची शक्यता असून, भविष्यातील गुंतवणुकीसाठी नाशिक एक आकर्षक ठिकाण ठरणार आहे.
आणखी वाचा























