Nashik Teachers Constituency : नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत अनेक इच्छुकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र या निवडणुकीत आता एक मोठा ट्विस्ट आला असून शिक्षकांची सर्वात मोठी संघटना टीडीएफमध्ये (TDF) उभी फूट पडल्याचे चित्र आहे. 


भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe), महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे बंधू राजेंद्र विखे (Rajendra Vikhe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या पाठोपाठ आता टीडीएफ संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य निशांत रंधे (Nishant Randhe) यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सर्वात मोठ्या संघटनेत रंधे यांच्यामुळे फूट पडल्याचे दिसून येत आहे. 


भाजपकडून उमेदवारी मिळेल, निशांत रंधेंचा दावा


टीडीएफ संघटनेकडून उमेदवारी मिळावी अशी रंधे यांनी मागणी केली होती. मात्र रंधे यांना उमेदवारी नाकारल्याने आता ते भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. धनशक्तीला उत्तर देण्यासाठी उमेदवारी करत असल्यास देखील निशांत रंधे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शिक्षक निवडणुकीत शिक्षकांच्या सर्वात मोठ्या टीडीएफ संघटनेत फूट पडल्याने ही निवडणूक चर्चेत आली आहे. 


शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार : राजेंद्र विखे


दरम्यान, राजेंद्र विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मला शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत.  राजकारण विरहित शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करायचे आहे. विनाअनुदानित प्राध्यापकांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना अनुदानित करायचे आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दरबारी प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न असेल त्यांनी मी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 


संदीप गुळवेंना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर


काँग्रेस नेते संदीप गुळवे यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. संदीप गुळवे यांना नाशिक शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी संदीप गुळवे म्हणाले की, माझा आज प्रवेश करून घेतला त्याबद्दल धन्यवाद देतो. आज माझा प्रवेश करून शिक्षकांची सेवा करण्याची संधी दिली आहे, माझी उमेदवारी केली आहे. हा विश्वास मी सार्थ ठरवेल.  नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा मी जिंकून आणून आणेल. ही संधी मला दिली त्याबद्दल मी आभार मानतो, असे त्यांनी म्हटले. 


आणखी वाचा 


'बंडखोरी नाही, राजकीय जोडे बाजूला ठेवत शिक्षकांसाठी लढणार', नाशिक शिक्षक मतदारसंघातून विवेक कोल्हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात