Vidhan Parishad Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Division Teachers Constituency) निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृतीस सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी नाशिक शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारीसाठी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhhe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विवेक कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी बंडखोरी केलेली नाही. मुळात ज्या मतदारसंघाची निवडणूक आहे तो शिक्षकांशी निगडित मतदारसंघ असल्याने इथे राजकीय जोडे बाजूला ठेवून या उमेदवारीकडे बघितले पाहिजे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सगळे पक्ष मिळून प्रयत्न केले पाहिजे. शिक्षक हा देश घडवणारा महत्त्वाचा घटक आहे, असे त्यांनी म्हटले.
पक्ष विरहित उमेदवारी करावी, असा शिक्षकांचा आग्रह - विवेक कोल्हे
ते पुढे म्हणाले की, यात उमेदवारी अपक्ष भरवण्याचा ठरवलं आहे. पक्ष विरहित उमेदवारी करावी, असा शिक्षकांचा आग्रह होता. त्यामुळे मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चर्चा अशी काही झालेली नाही. परंतु एक निवडणूक प्रक्रिया त्याचा हा भाग आहे. जी ती गोष्ट ज्या त्या वेळी झाली पाहिजे. कामाला लागण्यासाठी मी पहिले उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक लागल्यावर एक-एक मत महत्त्वाचे असते. एक-एक व्यक्ती महत्त्वाचा असतो. ज्यावेळी अपक्ष उमेदवारी करतो त्यावेळी कुठल्याही पक्षाकडे पाठिंबा मागण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, विवेक कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार या देखील उपस्थित होत्या.
दरम्यान, किशोर दराडे शिंदे गटाच्या संपर्कात?
नाशिक विभागाचे शिवसेना ठाकरे गटाचे पुरस्कृत विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे (Kishor Darade) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीमार्फत पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून किशोर दराडे हे महायुतीच्या अनेक कार्यक्रमात दिसून आले आहेत. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र आतापर्यंत किशोर दराडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
भाजपाच्या युवा नेत्यांकडून विखे पाटलांना घरचा आहेर, विवेक कोल्हेंच्या नेतृत्वात शिर्डीत मोर्चा