Nashik  News : नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Nashik Teachers Constituency Election 2024) प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अनेक इच्छुकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र या निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट आल्याचा पाहायला मिळाला आहे. भाजपकडून विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या पाठोपाठ आता भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील (Rajendra Vikhe Patil) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात आता चुरस वाढल्याचे चित्र आहे. 


उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजेंद्र विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मला शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत.  राजकारण विरहित शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करायचे आहे. विनाअनुदानित प्राध्यापकांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना अनुदानित करायचे आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दरबारी प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न असेल त्यांनी मी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 


निवडणुकीत राजकारणाचा संबंध नाही


तुम्हाला भाजपकडून उमेदवारी मिळणार का? अशी विचारणा केली असता राजेंद्र विखे पाटील म्हणाले की, मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांना भेटलो आहे. त्यांना उमेदवारीसाठी निवेदन दिले आहे. एक संधी द्या काम करण्याची अशी विनंती मी त्यांना केली आहे.  माझ्यामागे एक मोठा अनुभव आहे. एका विद्यापीठाचा कुलपती तसेच 25 वर्ष पुणे विद्यापीठाचा सिनेट सदस्य, पुणे विद्यापीठाचा कौन्सिलिंग सदस्य, असा माझा अनुभव आहे. वेळप्रसंगी मी शिक्षकांसाठी आंदोलने केली आहेत.  या निवडणुकीत राजकारणाचा संबंध येत नाही. आम्हाला शिक्षकांच्या समस्या सोडवायच्या आहेत, असे त्यांनी म्हटले. 


उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ


नाशिक शिक्षक मतदारसंघातून भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबाबत राजेंद्र विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, मी त्यावर भाष्य करणार नाही. पक्ष काय निर्णय घेईल याबाबत सात तारखेपर्यंत वाट बघायची. मी पॉझिटिव्ह आहे, उद्या लोकसभेच्या निकालानंतर बघू महायुती काय निर्णय घेणार आहे. उमेदवारी न मिळाल्यास आम्ही सर्व बसून निर्णय घेऊ, आम्ही एकत्र बसून कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


'बंडखोरी नाही, राजकीय जोडे बाजूला ठेवत शिक्षकांसाठी लढणार', नाशिक शिक्षक मतदारसंघातून विवेक कोल्हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात