Nashik News : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे (Nashik and Dindori Lok Sabha Constituency) मतदान पार पडल्यानंतर उद्या मतमोजणी होणार आहे. नाशिकमधील अंबड परिसरातील वेअर हाऊस या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदान मोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांना येणारे मार्ग हे स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. त्यासोबतच पोलिसांचा (Police) देखील कडेकोट बंदोबस्त परिसरामध्ये तैनात असणार आहे.


अंबड औद्योगिक वसाहतीतील ग्लॅस्को कंपनीनजीक असलेल्या सेंट्रल वेअर हाऊस येथे नाशिक आणि दिंडोरी लोकसभेची मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने अंबड सेंट्रल वेअर हाऊस येथे दिंडोरी आणि नाशिकची मतमोजणी एकाच वेळी म्हणजेच सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, त्यासाठी पोलिसांनी वेअर हाऊसकडे येणाऱ्या मार्गावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांच्या राहूट्या उभारण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रात मोबाइलसह लॅपटॉप तसेच इतर साहित्य नेण्यास बंदी केली आहे. ज्यांच्याकडे निवडणूक विभागाकडील अधिकृत ओळखपत्रे असतील अशांनाच मतमोजणी केंद्रावर जाता येणार आहे. 


मतमोजणी केंद्राभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त 


त्याचप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया सुरू असतानाचे थेट समालोचन करण्यासाठी विविध ठिकाणी भोंगे लावण्यात आले तर उमेदवारांचे हितचिंतक तसेच कार्यकत्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकत्यांच्या वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र मात्र वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राभोवती प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मतमोजणी केंद्रात येणाऱ्यांची तपासणी करूनच त्यांना आतमध्ये सोडण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार असून, दिंडोरी लोकसभेची मतमोजणी निकाल सायंकाळी चार वाजेपर्यंत तर नाशिक लोकसभेचा निकाल सायंकाळी सहा वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे.


महायुतीच्या उमेदवारांकरिता असलेली पार्किंग


चुंचाळे पोलीस चौकीच्या बाजूचे मैदान, (पार्किंगकडे जाण्याचा मार्ग पाथर्डी फाटा, गरवारे, चुंचाळे पोलीस चौकी)


महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी असलेली पार्किंग 


अंबड पॉवर हाऊसच्या समोरील मैदान (पार्किंगकडे जाण्याचा मार्ग पाथर्डी फाटा, सिडको हॉस्पिटल अंबड पॉवर हाऊस


उर्वरित पक्ष व अपक्षांसाठी पार्किंग 


फिनोटेक्स कंपनी/नेक्सा शोरूमसमोरील मोकळ्या जागेत (पार्किंगकडे जाण्याचा मार्ग पाथर्डी फाटा सिडको हॉस्पिटल, फेशअप बेकरी ते फिनोटेक्स कंपनी)


या मार्गावर प्रवेश बंद


जेमिनी इंस्ट्राटेक लिमिटेड कंपनी एम.आय.डी. सी. अंबड ते अंबड वेअर हाऊस ते पावर हाऊस अंबडकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ग्लॅक्सो कंपनी मेन गेट अंबड लिंक रोड, ते संजीवनी बोटनिकल नर्सरीकडे जाणाऱ्या मार्गावरील अवजड वाहतुकीस प्रवेश बंद. अंबड गावाकडून दोंदे मळ्याकडे येणाऱ्या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येणार आहे.


वाहतुकीस पर्यायी मार्ग


जेमिनी इंस्ट्राटेक लिमिटेड कंपनी ते उज्ज्वल गुंदाई नाशिक ते गरवारे या मार्गाने वाहतूक सुरू राहील. गरवारे ते पावर हाऊस मार्गे एक्स्लो पॉइंट या मार्गाने वाहतूक सुरू राहील. अंबड गावाकडून दोंदे मळ्याकडे येणाऱ्या मार्गावरील वाहने ही अजिंठा हॉटेल मार्गे एक्स्लो पॉइंटकडून वळण घेऊन जातील.