Ajit Pawar : अजित पवारांचं राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात मनोगत झालंच नाही. त्यांनी स्वतःचं मनोगत करणं टाळलं की त्यांना बोलुचं दिलं नाही? असे प्रश्न उपस्थित करत सभागृहात उलट-सुलट चर्चा रंगली. मात्र याचा खुलासा अद्याप तरी कोणी केला नाही. मंत्री दीपक केसरकर, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मनोगत करणं अपेक्षित होतं, मात्र थेट राज्यपाल रमेश बैस बोलायला उभे राहिले. त्यावेळी निवेदिकेकडून प्रोटोकॉल चुकला असं सर्वानाच वाटलं. मात्र राज्यपालांचे मनोगत संपल्यावर थेट आभार प्रदर्शन झालं. त्यामुळं सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. मंच कोणता ही असो, दादा त्यांच्या खास शैलीत व्यक्त होतातच. मग राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात नेमकं काय घडलं? त्या मंचावर अजित दादांचं मनोगत का झालं नाही? त्यांनी स्वतःचं मनोगत करणं टाळलं की त्यांना मनोगत करू दिलं नाही? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले गेले. आता जेंव्हा दादाचं याचा खुलासा करतील तेंव्हाच या मागचं गुपित जनतेसमोर येईल.


५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे  उद्घाटन संपन्न


राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 50  व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. विविध संस्था आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे हे केवळ विज्ञान प्रदर्शन न राहता विज्ञानाचा उत्सव झाला आहे. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे हे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल,असा विश्वास बैस यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, एनसीईआरटीचे सहसंचालक डॉ. श्रीधर श्रीवास्तव, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते. 


बाल वैज्ञानिक प्रदर्शन 2023
राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. संपूर्ण देशातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, विविध भागधारक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती या प्रदर्शनास भेट देणार आहेत. प्रदर्शनाकरीता 31 राज्यातील  विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला आहे. या व्यतिरिक्त नवीन शैक्षणिक विचार प्रवाह, यशोगाथा व यशस्वी उपक्रम यासाठी राज्यातून निवडक 25 दालनाद्वारे विविध शासकीय व स्वयंसेवी संस्था यांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. हे प्रदर्शन 30 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार आहे.


प्रदर्शनाचा मुख्य विषय  'तंत्रज्ञान आणि खेळणी' असा निश्चित केला आहे. सामाजिक,पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून  माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती, पर्यावरणास अनुकूल सामग्री, आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि नवोपक्रम,पर्यावरणीय चिंता,  वर्तमान नवोपक्रमासह ऐतिहासिक विकास आणि आमच्यासाठी गणित असे सात उपविषय निर्धारित करण्यात आले आहेत.