Nashik Igatpuri : एकीकडे नाशिक (Nashik) जिल्ह्यात अवकाळी आणि गारपिटीने (Hailstorm) कहर केला असताना दुसरीकडे इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात मात्र दरवर्षीप्रमाणे पाण्याचे (Water Crisis) दुर्भिक्ष्य नजरेस पडू लागले आहे. तालुक्यातील वाड्या-पाड्यावरील नागरिकांची पाण्यासाठी दोन दोन किलोमीटरवर पायपीट सुरु झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाण्यासाठी महिलांचा आटापिटा सुरु झाल्याचे दिसू लागले आहे.
गेल्या महिनाभरापासून नाशिकसह (Nashik District) जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. शेतीपिकाचे अतोनात नुकसान होत आहे तर दुसरीकडे सर्वाधिक पाऊस कोसळणाऱ्या इगतपुरी तालुक्यात पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ महिलांसह पुरुषांवर आली आहे. त्याचबरोबर उन्हाची दाहकता देखील वाढत असून अवकाळीसह गारपीट देखील होत आहे. तर जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीटंचाई देखील जाणवू लागली आहे. इगतपुरी तालुक्यातील वाड्या वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
इगतपुरी (Igatpuri) नगरपरिषद हद्दीतील तळेगाव शिवारातील कातरवाडी, वाघाचा झाप, मेंगाळ झाप या वस्तीमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जवळपास दोनशे ते अडीचशे लोकसंख्या वस्ती असलेल्या आदिवासी नागरिकांना भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. या परिसरातील चार पाच विहिरींमधील पाणी केमिकलच्या रसायनामुळे दूषित झाल्याने येथील नागरिकांना थेट दोन ते तीन किलोमीटर अंतर असलेल्या घाटनदेवी मंदिरासमोरील उंटदरीतील झिऱ्यातील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करावा लागत आहे. या वाडीपासून हे नंतर जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असून भर उन्हात येथील महिलावर्ग हंडाभर पाण्यासाठी पायपीट करत आहे.
पावसाच्या माहेरघरात पाणीटंचाई
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. दरवर्षी इगतपुरी तालुक्यात जवळपास सुमारे 4 हजार मिलिमीटर पाऊस पडत असूनही पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत असल्याचे चित्र आहे. ऐन एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस बरसतो आहे. दुसरीकडे इगतपुरी तालुक्यात पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. येथील महिलांना जवळपास किलो दोन किलोमीटर पर्यंत पायपीट करावी लागत आहे आणि एवढं करून देखील झिऱ्यातील गढूळ पाणी प्यावं लागतं आहे. त्यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी पाण्याची सोय करून द्यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
विहिरींच्या पाण्यात केमिकल
दरम्यान, या परिसरातील नागरिक जवळच्या तळेगाव डॅममधून येणाऱ्या सांडव्याव्यातील पाण्याचा उपयोग होत असे. परंतु या पाण्यात अज्ञात व्यक्तीने केमिकल टाकल्याने पाण्यावर तेलाचा तवंग तयार झाला आहे. त्यामुळे मासे आणि खेकडे हे देखील मृत्युमुखी पडले असून ज्या बाजूने हे पाणी वाहत जाते. त्या बाजूच्या शेतातील पिकांवर देखील याचा परिणाम झाला आहे. याच पाण्याचा वापर परिसरातील वाड्या पाड्यातील नागरिक जनावरांसाठी कपडे धुण्यासाठी करत होते. तसेच पिण्यासाठी जवळच्या विहिरीचा वापर करत होते. मात्र या विहिरीतही केमिकलयुक्त पाणी तयार झाल्याने वापर बंद झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ही समस्या असून अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याने येथील नागरीकांना दोन किलोमीटर जाऊन झिऱ्यातील पाणी आणावे लागत आहे.