Nashik Rain Update : अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं (Unseasonal Rain) नाशिक जिल्ह्याला झोडपलं असून शनिवारी सायंकाळी शहरासह निफाड, दिंडोरी, चांदवड, बागलाण तालुक्यातील अनेक भागास वादळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले. त्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा नुकसान झाले असून द्राक्ष बागांना याचा फटका बसला आहे. 


गेल्या महिनाभरापासून अवकाळी पावसाने नाशिकसह (Nashik) जिल्ह्याला चांगलंच हादरवून सोडले आहे. दिवसाआड होत असलेल्या गारपिटीमुळे शेतकरी  (Crop Damage) मेटाकुटीला आला आहे. अशातच काल सायंकाळी पुन्हा एकदा नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी बरसत (Stormy Wind) असल्याने नागरिकांसह शेतकरी हतबल झाला आहे. मार्च महिन्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. एप्रिलच्या पूर्वार्धात त्याची पुनरावृत्ती कायम राहिली असून आधीच कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यात आजच्या अवकाळी पावसाने पुन्हा भर घातली आहे.  पुन्हा नव्याने भर पडत आहे.


दरम्यान दोन ते तीन दिवस विश्रांती घेणाऱ्या अवकाळीने शनिवारी पुन्हा अनेक भागांत जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. अनेक भागात गारांचा पाऊस पडला आहे. बाजारपेठा, रस्त्यांवरील छोटे विक्रेते, पादचाऱ्यांची धावपळ उडाली. रामकुंड आणि पंचवटी मंदिरात पूजा विधी आणि दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना देखील पावसाने झोडपून काढले तर जिल्ह्यातील अनेक भागात गारपिट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा पुन्हा तडाखा बसला. यात दिंडोरी, सिन्नर, चांदवड, निफाड आदी तालुक्यात गारपीट झाली. अनेक भागांत गारांचा खच पडल्याचे पाहायला मिळाले. अवकाळी पावसाने आणि गारपिटीने कांदा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला इतर पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या द्राक्षांचा हंगाम भरात असून वारंवार नैसर्गिक संकट येत असल्याने वर्षभर जपलेल्या अनेक द्राक्ष बागांमध्ये चिखल झाला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने हातात तोंडाच्या आलेला घास हिरावला जात आहे. 


शेतीपिकांचे पुन्हा अतोनात नुकसान 


नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, सिन्नरसह काही भागांत अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने काढणीला आलेल्या गहू, हरभरा ,द्राक्षे, टरबूज या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास पावसाने नाशिक शहरात हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. तर नाशिक शहरात आज सकाळपासून उन्हाचा कडाका जाणवत होता. त्यानंतर चार वाजेच्या सुमारास ढग दाटून आले होते. यानंतर पावणे सहा वाजेच्या सुमारास पावसाने वादळी वाऱ्यासह शहरातील मेनरोड परिसरासह सातपूर, सिडको, परिसरातील काही भागांत हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर धांदल उडाल्याचे दिसून आले.