Hingoli Water Issues:  उन्हाळा लागला आणि तापमान वाढायला लागलं की, पाणीटंचाई (Water Issues) सुरू होते. याच पाणीटंचाईच्या झळा आता हिंगोली जिल्ह्याला (Hingoli District) बसताना पाहायला मिळत आहे. हिंगोलीच्या लक्ष्मण नाईक तांडा गावाला अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. मार्च महिन्यातच या गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर गावतील नागरिक भर उन्हात पायपीट करून पिण्यासाठी पाणी आणताना पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे गावाला पिण्याचे पाणीच नसल्याने नागरिक अक्षरशः गाव सोडून गेलेत. या गावातील 50 टक्के लोकांचे पाण्यामुळे स्थलांतर झाले आहे. तर उर्वरित गावकऱ्यांना दोन-तीन किलोमीटर लांबून डोक्यावर पाणी आणतायत. 


हिंगोली जिल्ह्यातील 1500 लोकसंख्या आसलेल्या लक्ष्मण नाईक तांडा गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. हे गाव डोंगराळ भागात असल्याने, भारताच्या नकाशावर आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून उन्हाळा लागला की, पाणीटंचाईची समस्या या गावकऱ्यांच्या नशिबी कायम पाहायला मिळते. गावात पाणी नसल्याने नागरिक दोन किलोमीटर डोंगरात पायपीट करून डोंगरातील विहिरीतून पाणी आणतात. विशेष म्हणजे यासाठी देखील जीवघेणी कसरत करावी लागते. 


गावकऱ्यांची दिवसभर पाण्यासाठी पायपीट 


गावात पाणीच नसल्यानें गावातील 50 टक्के गावकऱ्यांनी स्थलांतर केले आहे. तर अनेकांनी गाव सोडून जाण्याची पसंती दिली आहे.  गावात राहत असलेल्या नागरिकांची पाण्याशिवाय मोठी वाटाघात होत आहे. त्यातच मुलं सोडून गेलेल्या वृद्ध व्यक्तींना डोंगरात पाणी आणण्यासाठी मोठ कसरत करावी लागत आहे. तर काहींना डोंगरात जाणे शक्यच होत नाही. विशेष म्हणजे गावात पाणी नसल्याने गावापासून दोन किलोमिटर आसलेल्या डोंगरात पायपीट करत नागरिक डोक्यावर पाणी आणत आहेत. त्यामुळे  लक्ष्मण नाईक तांडा गावातील नागरिक दिवसभर पाण्यासाठी पायपीट करत असतात. धक्कादायक म्हणजेच नेहमीच पायपीट करून पाणी आणल्याने काही नागरिकांना आजार जडल्याचे सुद्धा गावकरी सांगतात. त्यामुळे लक्ष्मण नाईक तांडा गावातील पाण्याची समस्या सोडवावी आशि मागणी गावकरी  करत आहेत.


गावात शासकीय योजना पोहचल्याच नाही...


ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून सतत वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहे. विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यात देखील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांची नळ योजना राबवली जात आहे. मात्र असे असताना  लक्ष्मण नाईक तांडा गावात अजूनही शासनाची कोणतेही योजना अजून पोहचू शकली नाही. त्यामुळे एकीकडे मराठवाडा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना, दुसरीकडे त्याच मराठवाड्यातील लक्ष्मण नाईक तांडा गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः स्थालंतर करत असल्याचे चित्र आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या :


उन्हाळ्यातील कुक्कुटपालनाची चतुःसूत्री, 'अशा' प्रकारे करा उन्हाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन मगच मिळेल अधिकचे उत्पन्न