Nashik Long March : शेतकरी लॉन्ग मार्च (Long March) इगतपुरी (Igatpuri) येथे दाखल झाला असून आजच्या दिवसाचा मुक्काम घाटनदेवी (Ghatandevi) परिसरात होणार आहे. त्यांनतर पुन्हा हे लाल वादळ मुंबईच्या दिशेने पाऊल उचलणार आहे. आनंदाचा शिधा (Annadacha Shidha) वर्षभर पुरणार का? असं अन्न एकदाच मिळतं, मग ते वर्षभर कसं पुरवायचं? असा सवाल मोर्चेकऱ्यांमधून करण्यात आला आहे. 


आजच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे लाल वादळ इगतपुरीत दाखल झाले आहे. या ठिकाणी काही वेळ विश्रांती घेऊन पुढे घाटनदेवीच्या दिशेने लाल वादळ पुढे जाणार आहे. तब्बल चार वर्षांनंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा आवाज विधानभवनावर घुमणार असून नाशिकमधून (Nashik) निघालेलं लाल वादळ इगतपुरी तालुक्यात दाखल झाले आहे. लाल वादळाच्या लॉन्ग मार्चचा आजचा तिसरा दिवस असून शेतकरी वर्गाचा हा लॉन्ग मार्च दुपारपर्यंत घोटी शहरापर्यंत पोहचला होता. त्यानंतर हळूहळू हे लाल वादळ इगतपुरी शहरात दाखल झाले आहे. अशातच इगतपुरी शहरात एबीपी माझाच्या मुद्द्याचं बोला कार्यक्रमात मोर्चेकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडत सरकारला धारेवर धरले. 


राज्यात सरकार कुणाचंही असो शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो. आजही सामान्य नागरिक शेतकरी आपल्या प्रश्नासाठी झगडतो आहे, लढतो आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. इकडे लाल वादळाने एकत्र येत पुन्हा सरकारला घाम फोडण्यासाठी लॉन्ग मार्चचं आयोजन केले. त्यानुसार मागील 50 ते 55 तासांपासून हजारो शेतकरी लॉन्ग मार्चच्या माध्यमातून पायी चालत आहेत. दिंडोरी (dindori) येथून निघालेला पायी लॉन्ग मार्च काल शहरातील जवळील आरोग्य विज्ञान विद्यापीठातील मुक्कामांनंतर नाशिक शहरातून पुढे निघाला. आता हा मोर्चा इगतपुरीत दाखल झाला आतापर्यंत या मोर्चाने जवळपास 73 किलोमीटरहून अधिक अंतर कापलं आहे. 


पुन्हा जुन्याच मागण्यांसाठी लॉंग मार्च


दरम्यान पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी नाशिकमधून लॉन्ग मार्च काढला होता. विविध मागण्यांसाठी हजारो शेतकरी महिला भगिनी पायपीट करत नाशिकहून मुंबईला पोहोचले होते. कुणाचे पाय रक्त बंबाळ झाले होते तर कुणाचे पाय सुजलेले होते. एवढं करून काहीही उपयोग झाला का? कारण पुन्हा त्याच मागण्यांसाठी हे सर्व शेतकरी मजूर व आदिवासी बांधव पुन्हा एकदा डांबरी रस्त्यावरून उन्हाचा चटका सहन करत मुंबईला निघाले आहेत. या मोर्चातून पुन्हा एकदा या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का? शेतकऱ्यांना वारंवार मोर्चे का काढावे लागतात? आंदोलन का करावे लागतात? हे सर्व प्रश्न उपस्थित झाले आहेत.