Nashik Dada Bhuse : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचा काही दिवसांपूर्वी चोराला पकडून दिल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता ताफ्याला कट मारून पळणाऱ्या वाहनाला भुसेंनी पाठलाग करत पकडल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या वाहनातून अवैध गोवंश वाहतूक (Cattle transport) करण्यात येत होती. या संदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
नाशिकच्या मालेगाव (Malegaon) दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला एका भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाने कट मारत पळण्याचा प्रयत्न केला असता मंत्री भुसे यांनी त्याचा पाठलाग करत रस्त्यावर उतरून गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली. या वाहनातून अवैधरीत्या गोवंश वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाल्याने मंत्री भुसे यांनी हे वाहन पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्री भुसे हे मालेगाव दौऱ्यावर आल्यानंतर ग्रामीण भागात भेटीसाठी जात असताना हा प्रकार घडला.
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मालेगाव दौऱ्यावर होते. मालेगावकडे जात असताना महामार्गावर त्यांच्या ताफ्याला पिकअप वाहनाने कट मारला. चालकाच्या समयसूचकतेमुळे गाडीवर नियंत्रण होते. मात्र दादा भुसे यांनी संबंधित वाहनाचा पाठलाग करण्याचे ठरवले. त्यानुसार त्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करत पकडले. गाडीवरील चालकाची दादा भुसे यांची चांगलीच कानउघाडणी केली. शिवाय त्यांनी इतर अधिकाऱ्यांना वाहनांची तपासणी करण्यास सांगितले असता गाडीत अवैध पद्धतीने गोवंशची वाहतूक करण्यात येत असल्याचं समोर आलं. त्यामुळे भुसे यांनी स्थानिक पोलीस अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना पाचारण करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, या घटनेमुळे अवैध गोवंश वाहतूक पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीतून छुप्या पद्धतीने अवैध वाळू वाहतूक, गोवंश वाहतूक तसेच लाकूड वाहतूक आदी सुरू असल्याचा गुप्त चर्चा होत आहेत. याबाबत संबंधित विभागाकडून रात्रीतून गस्त वाढवून अनाधिकृत वाहतूकीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
नाशिकमध्ये अवैध गोवंश वाहतूक
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यातील काही भागातून गोवंशची अवैध पद्धतीने वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. अनेकदा वाहनाचा अपघात होतो किंवा स्थानिक कार्यकर्त्यांकडून वाहतूक रोखली जाते. अशा घटनांमधून गोवंश वाहतुकीची अवैध पद्धत समोर येत आहे. त्याचबरोबर गोवंश वाहतुकीला आळा बसावा, यासाठी नागरिकही जागरूक झाले आहेत. तरुणांच्या मदतीने अनेक भागात गोवंश वाहतूक रोखली जाते. शिवाय पोलिसही तात्काळ संबंधितांवर कारवाई करत आहेत. मात्र तरीदेखील गोवंश वाहतूक होत असल्याचे सातत्याने निदर्शनास येत आहे.