Nashik Bhimjayanti : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. राज्यभरातही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केलं जात आहे. नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कुठे सायकल राईड, तर कुठे बारा तास वाचन, तर कुठे रांगोळी साकारण्यात आली आहे. 


देशात आणि राज्यात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bhimjayanti 2023) यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिक (Nashik) शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह असून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासह अनेकांनी बाबासाहेबांना अनोखे अभिवादन केले आहे. या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाते..नाशिक जिल्ह्यातील नांदगावातील (Nandgaon) ममता रवींद्र आहेर या विद्यार्थिनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बाबासाहेबांची आकर्षक अशी रांगोळी काढत आपल्या कलेद्वारे त्यांना अनोखे अभिवादन केले आहे. विविध रंग संगती साधून एका छोट्या टेबलवर ही रांगोळी साकारतांना तब्बल पाच तास तिने मेहनत घेतली. तिच्या या मेहनतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


तर नाशिक शहरातील नाशिक सायकलिस्टच्या (Nashik Cyclist) वतीने पन्नास किमीची सायकल राईड करण्यात आली आहे. नाशिक ते धोंडेगाव आणि धोंडे गाव ते नाशिक अशी ही पन्नास किलोमीटरची राईड करण्यात आली आहे. यात सायकलराईड मध्ये जवळपास पन्नासहून अधिक सायकलिस्टनी सहभाग नोंदविला होता. यात महिला पुरुषहि सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. नाशिकहून निघालेली सायकल राईड गंगापूर रोडमार्गे गंगापूर, दुगाव फाटा, गिरणारे, धोंडेगाव अशी करण्यात आली. यात बाबासाहेबांच्या जयघोषांसह परिसर दणाणून गेला होता. 


नांदगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आंबेडकर जयंती निमित्ताने 12 तास पुस्तक वाचन केले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्यसाधून नाशिकच्या नांदगाव येथील विश्व शांती बुध्द विहारात इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 12 तास पुस्तक वाचन करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले..या उपक्रमासाठी आधार बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या ॲड.विद्या कसबे, जयश्री डोळे, नेहा कोलगे आदींनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी केलेल्या या पुस्तक वाचनाने सर्वत्र कौतुक होत आहे. तर चांदवड तालुक्यातील कला शिक्षक देव हिरे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या हातांच्या कुंचल्यातून अप्रतिम चित्र साकारून अनोखे अभिवादन केले आहे. चांदवड तालुक्यातील नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव येथील कलाशिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून अतिशय सुंदर चित्र उभं केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांची ही कलाकृती सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून "पर्याय आहे शिक्षण" हा संदेश देणाऱ्या या अनोख्या फलक रेखाटनाची सर्वत्र चर्चा आहे.