Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात गोवंश पशुधनाचा बाजार व वाहतूक सशर्त परवानगी देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोवंशीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून 29 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्षेत्रात कोणताही प्राणी बाजार भरविणे आणि प्राण्यांच्या शर्यती लावण्यास परवानगी देऊ शकतात, असे नमूद केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी 9 सप्टेंबर 2022 रोजीचे निर्बंध शिथील करून जिल्ह्यात कोणताही प्राणी बाजार भरवणे तसेच जिल्ह्यांतर्गत गुरांची वाहतुक व ने-आण करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. 


केंद्र सरकारच्या  मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यांतर्गत वाहतुक व ने-आण करावयाच्या गुरांचे (गोवर्गीय प्रजातींचे सर्व जनावे) किमान 28 दिवसांपूर्वी लम्पी चर्मरोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र तसेच लम्पी चर्मरोगाची लक्षण दिसून आली नसलेबाबत आरोग्य प्रमाणपत्र बंधनकारक राहील. वाहतूक करणाऱ्या गुरांची ओळख पठविण्यासाठी कानात 12 अंकी टॅग असणे व त्याची (INAPH) पोर्टलवर नोंदणी बंधनकारक आहे. जिल्ह्यातील पशुबाजारामध्ये खरेदी व विक्री करतांना (कृषि उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत व इतर क्षेत्रे) प्राण्याचे कानात टॅग व स्वास्थ्य प्रमाणपत्र बंधनकारक आहे. तसेच बाजारामध्ये जंतुनाशक फवारणीही बाजार समितीस किंवा आयोजकास बंधनकारक राहील. या आदेशाचे अंमलबजावणी सर्व संबंधित प्रशासकिय विभागांनी काटेकोरपणे करावी, असे निर्देश या आदेशान्वये जिल्हाधिकारी  रेखावार यांनी दिले आहेत.


जिल्ह्यातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत


दरम्यान, लम्पी जिल्ह्यासह राज्यात शेकडो जनावरे दगावली आहेत. लम्पी आजारामुळे पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई जाहीर केली. त्यानुसार काहींना ही नुकसानभरपाई मिळाली. पण अद्याप अनेक पशुपालक शेतकरी वंचित आहेत. मृत झालेल्या जनावरांची भरपाई द्या, अशी आर्त हाक पशूपालक शेतकरी देत आहेत. दुसरीकडे, लम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांच्या मालकांचे कर्ज माफ करावे, अथवा त्यापोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या