14 April In History : आजचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा जन्मदिवस आहे. तर, भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा स्मृतीदिन आहे. जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना
1891: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म Dr Babasaheb Ambedkar Jayanti
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचे नेतृत्व करणारे प्रमुख योद्धे, अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित अशा बहुआयामी ओळख असणारे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्मदिन. अस्पृश्यता पाळली जात असताना, सामाजिक विषमतेला तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकारही म्हटले जाते.
बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या. तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत काम केले. महाडच्या चवदार सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यता विरोधी लढ्याचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या लढ्याला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी विविध पद्धतीने सहकार्य आणि मदत केली.
बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई विद्यार्थी होते.
भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. वर्ग, जात, धर्म, लिंग यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले होते.
स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश सरकारमध्ये मजूर मंत्री होते. त्यांनी त्या कालावधीत भारतीय कामगारांसाठी अनेक मोलाचे कायदे करून घेतले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप 1928-1934 या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप सात वर्ष सुरू होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला. 17 सप्टेंबर 1937 रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले. 10 जानेवारी 1938 रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली 25 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.
बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता आदी पाक्षिके, वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली होती. त्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांचे प्रश्न उचलून धरले.
अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने 1946 मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय,1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय 1953 मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर 1956 मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले.
1912 : आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर
1912 मध्ये बांधले गेलेले आर.एम.एस. टायटॅनिक हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. 10 एप्रिल 1912 रोजी इंग्लंडमधील साउथहॅंप्टन येथून हे जहाज न्यू यॉर्क शहराकडे सफरीला निघाले. चार दिवसांनी 14 एप्रिल 1912 रोजी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगासोबत झालेल्या टक्करीमध्ये टायटॅनिक जहाज बुडाले. यामध्ये एकूण 2,227 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांपैकी 1,517 लोक ह्या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक मानला जातो.
1919 - गायिका शमशाद बेगम यांचा जन्म
शमशाद बेगम या भारतीय गायिका होत्या. त्या हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिल्या पार्श्वगायिकांपैकी एक होत्या. त्यांनी 577 पेक्षा जास्त चित्रपटांत गाणी गायली आहेत. शमशाद बेगम यांचा जन्म अमृतसर, पंजाब येथे झाला. 2009 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.
1927: विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचा जन्म
दत्ताराम मारुती मिरासदार हे मराठीतले साहित्यिक, कथाकथनकार, विनोदी लेखक, पटकथाकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार ही त्रयी 1962 सालापासून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात कथाकथने करीत असत. त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची उत्तम करमणूक केली होती. मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदा लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारानी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे इत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे 24 कथासंग्रह, 18 विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत.
1962 : भारताचे पहिले अभियंते मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचे निधन
सर विश्वेश्वरय्या यांना भारतातील अग्रगण्य स्थापत्य अभियंत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्मदिन 15 सप्टेंबर हा भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांना "आधुनिक म्हैसूरचे निर्माता" म्हणूनही ओळखले जाते. भारत सरकारने त्यांना 1955 मध्ये भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. विश्वेश्वरय्या यांनी ब्रिटिश भारत सरकारसाठी सिव्हिल इंजिनीअर म्हणून आणि नंतर म्हैसूर राज्याचे पंतप्रधान म्हणून काम केले होते. म्हैसूर येथे असतांना त्यांनी जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' या सन्मानाने गौरव करण्यात आला. भारतातील धरण, पाटबंधारे क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.