Nashik News: पावसाने टोमॅटो पिक वाया गेलं, द्राक्षानेही पदरी निराशाच; विषारी औषध पिऊन शेतकऱ्याने संपवला जीव, 'द्राक्ष पंढरी' हादरली!
Nashik News: निफाड तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी कैलास पानगव्हाणे यांनी विषारी औषध सेवन करून जीवन संपविल्याची घटना घडली आहे.

Nashik News: निफाड (Niphad) तालुक्यातील उगाव (Ugaon) येथील प्रगतीशील शेतकरी कैलास यादवराव पानगव्हाणे (वय 45) (Kailash Yadavrao Pangavhane) यांनी सोमवारी (दि. 3) द्राक्षबागेत विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे उगावसह परिसरात शोककळा पसरली.
सतत पावसामुळे टोमॅटो पीक वाया गेले. त्यानंतर ज्या द्राक्षबागेवर सारी भिस्त होती, त्या बागेलादेखील छाटणीनंतर अत्यल्प फळधारणा झाली. त्यामुळे नैराश्यात असलेल्या कैलास पानगव्हाणे यांनी द्राक्षबागेसाठी फवारणीचे विषारी औषध घेत आत्महत्या केल्याने द्राक्ष पंढरीत हळहळ व्यक्त होत आहे.
Nashik News: टोमॅटो पिक वाया गेलं, द्राक्षानेही पदरी निराशाच
कैलास पानगव्हाणे यांच्या एकत्रित कुटुंबाची दीड एकर शेती आहे. त्यांनी टोमॅटाची एक बिघा क्षेत्रात लागवड केली होती. मात्र त्यातून निघालेले उत्पादनास बाजारभाव मिळाला नाही. याशिवाय पावसामुळे टोमॅटो पीकही वाया गेले, खर्चही निघाला नाही. द्राक्षबागेची फळबहार छाटणीनंतर त्यातून द्राक्षमाल अत्यल्प प्रमाणात निघाला. तो द्राक्षमाल पावसामुळे जिरू लागला होता. त्यामुळे कैलास पानगव्हाणे मानसिक तणावात होते.
Nashik News: कर्जाची परतफेडीची चिंता
ते सतत चिडचिड करत होते. टोमॅटो व द्राक्षबाग फवारणीसाठी उधारीवर आणलेल्या औषधांची देणेदारी कशी मिटेल, याची चिंता त्यांना भेडसावत होती. याशिवाय खाजगी उधार, उसनवारी, तसेच बँक ऑफ महाराष्ट्राकडून काढलेल्या कर्जाची परतफेडीची चिंता होती. ते नेहमी पत्नी आशाला द्राक्षमाल आला नसल्याचे बोलत होते. या विवंचनेतच ते सोमवारी द्राक्षबागेत गेले आणि विषप्राशन करून घेतले.
Nashik News: तोंडातून फेस आल्याने रुग्णालयात दाखल केले, पण...
थोड्या वेळाने घरात आल्यावर त्यांच्या तोंडातून फेस आल्याने त्यांना तत्काळ उपचारासाठी निफाड उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. उत्तरीय तपासणीनंतर उगाव येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार भास्कर भगरे, द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उन्मेष डुंबरे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. कैलास यांच्या पश्चात पत्नी आशा, मुलगा अक्षय व कृष्णा असा परिवार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
























