Nashik Cyber Crime : सायबर क्राईमच्या (Cyber Crime) माध्यमातून अनेक नवनव्या घटना समोर येत असतात. अनेक हॅकर्स ऑनलाईन किंवा सोशल मीडियाचा आधार घेऊन फसवणूक करतात. नाशिकमध्ये एका महिलेस ऑनलाईन (Online Fraud) कॉस्मेटिक खरेदी करणे चांगलेच महागात पडले आहे. या महिलेने कॉस्मेटिक खरेदी करताना फेसबुकचा वापर केल्याने पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. 


सोशल मीडियाचा (Social Media) वापर करताना अनेकदा जाहिराती येत असतात. बऱ्याचदा कमी पैशात अनेक वस्तूची विक्री होत असल्याचे युझर्सला दिसून येते. आणि यातूनच पुढे फसवणुकीचे प्रकार घडतात. दरम्यान सौंदर्य प्रसाधने तयार करण्याचा घरगुती व्यवसाय असलेल्या महिलेला व्यवसायाची वृद्धी करून देण्यासोबतच कस्टमर प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याकरिता तसेच सौंदर्य प्रसाधनांची फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ॲमेझॉन यासारख्या सोशल मीडियावर जाहिरात करण्यासाठी, ऑनलाईन ग्राहक मिळवून देण्यासाठी, ग्राहकांकडून पेमेंट प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे पेमेंट गेटवे लिंक तयार करण्यासाठी वारंवार पैसे भरण्यास सांगितले. यातून तब्बल 5 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नाशिक शहरात उघड झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना उत्तरप्रदेशातील गाझियाबादमधून अटक केली आहे.


नाशिकमधील (Nashik) एका महिला सौंदर्य प्रसाधने उत्पादक व्यावसायिक म्हणून काम करतात. त्यांनी व्यवसायाच्या वृद्धीसाठी फेब्रुवारी 2022 च्या अखेरीस फेसबुक वरील व्यापार इन्फो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या फेसबुक पेजला लाईक केले होते. त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून त्यांना वारंवार फोन करणाऱ्या व्यक्तींनी पवार यांना व्यवसायाची वृद्धी करणे, कस्टमर प्लॅटफॉर्म तयार करणे यासाठी 23 हजार रुपयांच्या नोंदणी शुल्काची मागणी केली. पवार यांनी सुरुवातीला त्यांना नकार दिला. मात्र संशयितांनी किमान एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. 


सोशल मिडियावर जाहिरात 


दरम्यान ही रक्कम ऑनलाईन भरल्यानंतरही संशयितांनी पवार यांना वेबसाईट तयार करण्यासाठी तसेच त्यांच्या उत्पादनांची फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, अॅमेझॉनसारख्या सोशल मीडियावर जाहिरात करण्यास सांगितले. यातून ऑनलाईन ग्राहक मिळवून देत त्यांच्याकडून पैसे मिळविण्यासाठी पेमेंट गेटवे लिंक तयार करण्यासाठी पेमेंट गेटवेचे लिमिट वाढविण्याची गळ घातली. त्यासाठी पवार यांना वेळोवेळी पैसे भरण्यास लावून एकूण 5 लाख 13 हजार 200 रुपयांची फसवणूक केली. पवार यांची फसवणूक करण्यासाठी पवार यांना एका बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले होते. 


संशयितास सात दिवसांची कोठडी 


या कंपनीचे संचालक नितीश रमेश कुमार आणि राज सोमवीर राघव असल्याची माहिती समोर आल्यानंतर संशयितांनी वापरलेला मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून संशयित नितीश रमेश कुमार याचाच असल्याचे समोर आले. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप बोराडे, पोलिस हवालदार शहाजी भोर, पोलिस नाईक चंद्रकांत पाटील यांचे पथक गाझियाबादला रवाना झाले होते. संशयित नितीश रमेश कुमार याला सायबर पोलिसांच्या पथकाने गाझियाबाद स्थानिक न्यायालयात हजर करून त्याची ट्रांजिट रिमांड प्राप्त करून त्याला नाशिकला आणले. नाशिक न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.