Nashik Ahinsa Run : नाशिक शहरातील आबाल वृद्धांसह हजारो नाशिककरांनी अहिंसा रनमध्ये (Ahinsa Run) उत्स्फूर्तपणे सहभाग घेत शांती आणि अहिंसेचा संदेश दिला. यावेळी दहा वर्षांपासून ते 91 वर्षांपर्यंत सर्वच नाशिककरांनी या अहिंसा रनमध्ये सहभाग घेत नाशिककरांमध्ये स्फुरण भरले.


भगवान महावीरांचा (Mahaveer) शांती आणि अहिंसेचा संदेश प्रसारित करण्यासाठी नाशिक (Nashik) शहरात अहिंसा रनचे  आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान दररोज सकाळी गजबजलेले असते. पहाटेपासून गर्दीचा ओघ वाढत गेला. नाशिककर तरुण-तरुणींचा उत्साह ओसंडून वाहत होता. यात वयोवृद्धही मागे न राहता अहिंसा रनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. विशेष म्हणजे 91 वर्षीय रामचंद्र बधान, 85 वर्षांचे नारायण वाळवेकर यांनी 3 किलोमीटर तर 85 बाळकृष्ण अलई यांनी तब्बल 10 किलोमीटर 'अहिंसा रन' पूर्ण करत समाजापुढे आदर्श ठेवला.


आज संपूर्ण जगात हिंसाचार होत असतांना त्यावर अहिंसा हाच एकमेव प्रभावी उपाय मानला जातो. हिंसा ही केवळ शारीरिक नसून ती मानसिकही असू शकते आणि ती केवळ मानवजातीसाठीच नाही तर पशुपक्ष्यांचीही होते. प्रेम, क्षमा, त्याग ही सर्व अहिंसेचीच रूपे आहेत. जगाला भगवान महावीरांचा शांती आणि अहिंसेचा संदेश प्रसारित करण्यासाठी आयएफएएल जितोद्वारे भव्य 'अहिंसा रन'चे आयोजन करण्यात आले. यावेळी अहिंसा रनमध्ये पाच हजारपेक्षा जास्त नाशिककरांनी उत्स्फूर्तपणे  सहभाग नोंदवत शांती आणि अहिंसेचा संदेश दिला. त्याबरोबरच स्वच्छ नाशिक, हरित नाशिक, सुंदर नाशिक याचाही जयघोष करीत प्रचार करण्यात आला. 


नाशिक शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे (Golf Club Ground) मैदानापासून सकाळी 6 वाजता प्रारंभ झाला. 3 किमी, 5 किमी आणि 10 किमी असा मार्ग होता. प्रमुख पाहुणे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केवळ उपस्थित न रहाता 5 किमी रनमध्ये सहभाग घेत अनोखा संदेश दिला. स्पर्धेच्या सुरुवातीला झुंबा नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विशेष म्हणजे, अहिंसा रन केवळ एका समुदायापुरती मर्यादित न ठेवता अहिंसेच्या बाजूने असलेल्या लोकांना स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले. सर्व स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल देण्यात आले. 10 किलोमीटर रन मध्ये पुरुष गटात प्रथम- असिफ खान, द्वितीय- रोहित यादव आणि तृतीय- महेश फासले तर महिला गटात प्रथम- राणी मुछेडी, द्वितीय- स्तुती एडनवाला आणि तृतीय- ज्योती नागरे यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 


अहिंसा रनमध्ये ज्येष्ठांचा उस्फुर्त सहभाग 


अहिंसा रनमध्ये 3 किलोमीटर स्पर्धेत सुमारे 3500, 5 किलोमीटर स्पर्धेत 1000 तर 10 किलोमीटर स्पर्धेत 800 अशा एकूण 5 हजारपेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग नोंदविला. स्पर्धेला गोल्फक्लब येथून सुरुवात होऊन 3 कि.मि. सिबल  हॉटेल, 5 कि.मी. एबीबी सर्कल व 10  कि.मी. सातपुर अशा तीन्ही स्पर्धांचा समारोप गोल्फक्लब येथेच झाला. विशेष म्हणजे, 91 वर्षांचे रामचंद्र बधान आणि 85 वर्षांचे नारायण वाळवेकर यांनी 3 किलोमीटर रन पूर्ण केला तर 85 बाळकृष्ण अलई यांनी तब्बल 10 किलोमीटर 'अहिंसा रन' पूर्ण करून समाजापुढे आगळावेगळा आदर्श निर्माण केला. या तिघांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.