Tata Mumbai Marathon : कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं (Tata Mumbai Marathon) आयोजन करण्यात आलं आहे. आज पहाटे 5 वाजून 15 मिनीटांनी टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या मॅरेथॉनला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित रहाणार आहेत.


 






मॅरेथॉन स्पर्धेसाठी वाहतुकीत काही बदल


दरम्यान, आजच्या या टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गाड्यांची व्यवस्था देखील करण्यात आली होती. बोरीवलीहून पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी लोकल सुटली.  दरम्यान, या स्पर्धेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून या मार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. आज पहाटे तीन ते 1 वाजून 15 मिनीटांपर्यंत वाहतुकीत हे बदल करण्यात आले आहेत. 






ढोल ताशांच्या गजरात स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे स्वागत


ढोल ताशांच्या गजरात या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला. टाटाकडून आयोजित हाफ मॅरेथॉनला देखील सुरुवात झाली आहे. माहीम येथून या स्पर्धेला सुरुवात झाली. हाफ मॅरेथॉनला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी हिरवा झेंडा दाखवला. कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर मुंबईमध्ये मॅरेथॉन होत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये खूप आनंद असल्याचे मत भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केले. टाटांकडून आयोजित मुंबई मॅरेथॉनमध्ये माहीम इथे हाफ मॅरेथॉन पोलीस कपमध्ये 14 हजार मुंबईकर सहभागी झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेसोबत मुंबई पोलिसांनी आणि आयोजकांनी जागोजागी लोकांसाठी पाण्याची सुविधा केली आहे. तसेच मेडिकलची व्यवस्था देखील केली आहे.