Nashik Srikant Shinde : प्रत्येक सभेत खोके, गद्दार, खंजीर हेच शब्द निघतात, मालेगावमध्ये सभा झाल्यानंतर आमदार सुहास कादे यांनी रास्त मागणी केली, त्यामुळे नार्को टेस्ट केली की खोके कोणाकडून आले, कुणाकडे गेले हे समजेल, अशी अप्रत्यक्ष टीका डॉ. श्रीकांत शिंदे (Srikant Shinde) यांची उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ज्यांना खोक्यांची सवय आहे, त्यांना खोकेच दिसत असल्याची टीका देखील श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली.
नाशिक (Nashik) शहरातील मायको सर्कल परिसरात नाशिक शिवसेना (Shivsena) मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), आमदार सुहास कांदे (Suhas Kande) आणि ईतर पदाधिकारी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी यावेळी हजेरी लावली होती. दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी भाषणात बोलतांना एकदा नार्को टेस्ट कराच, कोणाकडे किती खोके आहेत हे समजेल असं म्हणत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली. रोज उठले की सध्या एकच भाषण सध्या सुरू आहे. त्या भाषणात शब्द देखील एकच आहेत, खोके, गद्दार आणि खंजीर या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही, त्यामुळे लक्ष देणं बंद करा असं आवाहनच शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्याना दिले आहे.
आज शिवसेना या शिंदे गटाच्या (Shisvena Shinde Gat) मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन झाले. यावेळी ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले कि, या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटतील, राज्यातील लोकांना आता मुख्यमंत्री आणि सरकारबद्दल विश्वास आहे. या सर्वांच्या विश्वासावर हे कार्यालय पात्र ठरणार आहे. समस्यांचे निवारण आणि वेगवेगळे सेल या कार्यालयात असणार आहेत. आज एक भव्य दिव्य शिवसेना कार्यालय नाशिकमध्ये तयार करण्यात आले असून या कार्यालयात अनेक वेगवेगळे कक्ष आहेत. त्याचा लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे. सत्तांतर झाल्यानंतर शिंद भाजप सरकारने अनेक योजना आणल्या. गेल्या 9 महिन्यात चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. सर्वासाठी फायद्याचे बजेट यावेळी सादर करण्यात आले.
एकदा नार्को टेस्ट कराच....
मुख्यमंत्री दिवसा आणि रात्रीदेखील काम करत आहेत. अडीच वर्षात कशा प्रकारे काम सुरू होते हे आपल्याला माहिती आहे. गेल्या अडीच वर्षात नागरिकांना तरी सोडा मंत्र्यांनासुद्धा भेटायला वेळ मिळत नव्हती. आमदारांचा तर विषय सोडाच. वर्षावर सध्या सामान्य नागरिकांना देखील प्रवेश मिळत असून मुख्यमंत्री भेटत आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम पणे उभा आहे. आता देखील कांद्याला भाव मिळत नव्हते, त्यावर देखील सरकारने दिलासा देण्याचे काम केले. महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली. दुसरीकडे विरोधकांचे रोज उठले की एकच भाषण सध्या सुरू असून शब्द देखील एकच आहेत. मध्यंतरी सुहास कांदे बोलले नार्को टेस्ट करा, मात्र त्यांचं काही उत्तर आले नाही. ज्यांना खोक्यांची सवय आहे, त्यांना सारखे खोकेच दिसत आहे. एकदा नार्को टेस्ट कराच, कुणाकडे किती खोके आहेत, ते समजेल असा सल्ला देखील यावेळी शिंदे यांनी दिला.
संजय राऊत दिवस खराब करतात...
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले कि, संजय राऊत काय बोलतात यावर मला काही बोलायचं नाही. ते सकाळी उठल्यावर ते रात्री झोपेपर्यंत लोकांचा दिवस खराब करतात. संजय राऊत यांच्या बोलण्यावरून आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही. शिवाय राज्यातील लोकांना देखील त्यांच्या बोलण्याचा वीट आलेला आहे. तर शिंदे संभाजीनगर येथील सभेवर म्हणाले की, या अगोदरही ज्याही सभा झाल्या, त्यात तीनही पक्ष एकत्रच होते. फक्त आज अधिकृतरित्या एकत्र आले आहेत. आतापर्यंतच्या सभा झाल्या, त्यात कोणाची माणसं होती, ते आम्हाला सगळं माहिती आहे.