Nashik MVP Marathon नाशिक :  8 व्या राष्ट्रीय व 13 व्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन (Nashik MVP Marathon) स्पर्धेचा थरार रविवारी रंगला. भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केलेले मीर रंजन नेगी (Mir Ranjan Negi) यांची या मॅरेथॉनला प्रमुख उपस्थिती होती. 42 किलोमीटर अंतराच्‍या पूर्ण मॅरेथान स्‍पर्धेत उत्तर प्रदेशचा अक्षय कुमार (Akshay Kumar) विजेता ठरला आहे. 


सकाळी पावणे सहाला गंगापूर रोडवरील (Gangapur Road) मविप्र मॅरेथॉन चौक येथून मॅरेथॉन स्‍पर्धेला सुरुवात करण्यात आली. पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना अक्षय कुमार याने 2 तास 26.01 मिनिटात स्पर्धा पूर्ण करून त्याने अव्वल क्रमाक पटकावला. इतरही विविध गटांमध्ये धावपटूंनी सहभाग नोंदविला. 


अक्षय कुमारला एक लाखांचे पारितोषिक


अक्षय कुमार याला एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. या गटातून भारतीय लष्करातील सिकंदर तडखे (Sikandar Tadke) याने द्वितीय क्रमांकासह 75 हजारांचे पारितोषिक पटकावले आहे. 2 तास 26.23 सेकंद अशी वेळ नोंदवित तडखे याने स्‍पर्धा पूर्ण केली. तसेच गुरजित सिंग (Gurjit Singh) याने 2 तास 28 मिनिटांमध्ये स्‍पर्धा पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकावले. गुरजित सिंगला 51 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. 


21 किमी अर्ध मॅरेथॉनमध्ये रिंकु सिंगची बाजी


21 किमी अंतराच्‍या अर्ध मॅरेथॉनमध्ये उत्तर प्रदेशच्‍या रिंकु सिंगने (Rinku Singh) 1 तास 06 मिनिटे 35 सेकंदात प्रथम क्रमांक पटकावला. त्याला 25 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. 21 किमी अंतराच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्‍या बबलू चव्‍हाणने (Bablu Chavhan) द्वितीय पारितोषिक पटकावले. जळगावच्‍या दिनेश पाटील (Dinesh Patil) याने तृतीय क्रमांक मिळवला.


महिलांच्या शर्यतीत बसंती हेंबरोम प्रथम


महिलांसाठी खुल्‍या गटातील 10 किमीच्‍या शर्यतीत नाशिकच्‍या बसंती हेंबरोमने (Basanti Hembrom) 39 मिनिटे 21 सेकंदात प्रथम क्रमांक पटकावला. दिशा बोरसे (Disha Borse) हिने द्वितीय तर वंदना राहेरे (Vandana Rahere) हिने तृतीय क्रमांक पटकावला. दरम्यान, मविप्र संस्‍थेच्‍या रावसाहेब थोरात सभागृहात पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी मविप्र मॅरेथॉन संयोजन समिती अध्यक्ष व संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, संस्‍थेचे अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्‍वास मोरे, उपसभापती देवराम मोगल यांच्यासह पदाधिकारी उपस्‍थित होते.


आणखी वाचा