Dilip Walse Patil नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह, सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या पुढाकाराने सहकार क्षेत्रात अनेक बदल होत आहेत, अशी स्तुती राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केली. 


नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनने दि. 27 व 28 जानेवारीला महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स परिषदेचे आयोजन केले आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, मुंबईनाका येथे ही परिषद होत आहे. या परिषदेत दिलीप वळसे पाटील बोलत होते.  


सहकार खात्याची निर्मिती केल्याबद्दल मोदींचे आभार


ते म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील सहकारी संस्थाची संख्या आणि योगदान देणारं अग्रगण्य राज्य आहे. सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संस्था आशा 56 विषयात काम करणाऱ्या संस्थांना जनतेनं मदत केली आहे. 97 व्या घटना दुरुस्तीनंतर सहकार क्षेत्रात प्राधिकरणाची स्थापना करून निष्पक्षपणे निवडणूक पार पाडत आहे. स्वतंत्र सहकार खात्याची निर्मिती केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार.


सहकारी संस्थांतील ठेवींना वैयक्तिक संरक्षण देण्यासाठी विचार करावा


कष्टाळू नेते अमित शाह यांच्याकडे पंतप्रधान मोदींनी सहकार खात्याची धुरा दिली आहे. आर्थिक शिस्त, ठेवीदार यांना आर्थिक सुरक्षा दिली आहे.बँकिंग क्षेत्रासाठी सुयोग्य निर्णय केंद्र सरकारकडून घेतले जातील. राज्यात सहकारी पतसंस्थाचे जाळे आहे. अल्प-मध्यम उत्पन्न गटातील लोकांचा संबंध आहे. संबंधित बँक अडचणीत आल्या तर ठेवीदारांचे पैसे मिळणे अवघड होते आणि संरक्षण केवळ 5 लाख रुपयांना देते हे जुलमी आहे. राज्य सरकार यासाठी बदल करत आहे. सहकारी संस्थांतील ठेवींना वैयक्तिक संरक्षण देण्यासाठी विचार करावा, असे वळसे पाटील यावेळी म्हणाले. 


नागरी बँकांना पुढे नेण्यासाठी दिल्लीत बैठक घ्यावी


सहकारी संस्थांच्या बळकटीसाठी राज्य सरकार 100 कोटी रुपये देणार आहेत. केंद्र सरकारनेही 100 कोटी द्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रीय बँकेतून मोठ्या लोकांना मोठं कर्ज मिळते. पुढे ते कर्ज बुडवले तर ते केंद्र सरकार बजेटच्या माध्यमातून बँकांना मदत करते. नागरी बँकांच्या बाबतीत देखील असे निर्णय घ्यावेत, राज्य सरकार ही त्यात मदत करेल. नागरी बँकांना पुढे नेण्यासाठी दिल्लीत बैठक घ्यावी, अशी मागणी दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केली. 


भुजबळांच्या भूमिकेवर वळसे पाटलांनी बोलणं टाळलं


दरम्यान, मराठा आरक्षणाच्या निर्णयावर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उघड नाराजी व्यक्त केली. सहकार परिषदेनंतर भुजबळांच्या भूमिकेबाबत दिलीप वळसे पाटलांना विचारले असता ते म्हणाले की, मराठा समाजाच्या मागण्याच्या पार्श्वभूमीवर सरकार सकारात्मक होते. या निर्णयाचा मराठा समाजाला फायदा होईल. भुजबळ साहेब काय म्हणाले ते मला माहिती नाही. त्यांच्याशी बोलणे झाले नाही. त्यामुळे मला बोलता येणार नाही, असे म्हणत भुजबळांच्या भूमिकेवर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलणे टाळले.


आणखी वाचा 


Dada Bhuse : "कुणबी नोंद असेल तो कायद्याच्या चौकटीत ओबीसीत बसेल"; दादा भूसेंकडून थेट स्पष्टोक्ती