Nashik Weather Update नाशिक : नाशिकसह निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात (Temperature) प्रचंड घट झाली होती. गुरुवारी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात झाली आहे. गुरुवारी निफाडचे तापमान 4.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. रविवारी निफाड (Niphad) तालुक्यात किमान 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी निफाडचे कमाल तापमान 29.4 नोंदवले गेले आहे. सकाळी कडाक्याची थंडी आणि दुपारी ऊन असा अनुभव निफाडवासियांना आला आहे.
तर नाशिकमध्ये (Nashik) रविवारी 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी नाशिकचे कमाल तापमान 30.8 अंश सेल्सिअस इतके होते. नाशिकमध्ये यंदा उशिराने थंडीला (Winter) सुरुवात झाली. गेल्या चार ते पाच दिवसात नाशिककर थंडीने गारठले होते. रविवारचे तापमान 12.5 नोंदवले गेल्याने थोड्याफार प्रमाणात थंडी कमी झाल्याचे दिसून येते.
पुढील दोन आठवड्यांचा थंडीचा अंदाज
दरम्यान, पुढील दोन आठवडे खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे ८-१० डिग्री म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा १-२ डिग्रीने कमी असणार आहे. तर दुपारचे कमाल तापमान २६ डिग्री म्हणजे सरासरीपेक्षा २ डिग्रीने कमी असण्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
नाशिकला काहीशी कमी थंडी
नाशिक जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा एक ते दिड डिग्रीने अधिक राहून म्हणजे १४ डिग्रीच्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमीपेक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काहीशी कमी थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवायला मिळेल, असेही माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे.
'या' भागात पावसाची शक्यता
31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान उत्तराखंडमध्ये हलक्या स्वरुपातील पाऊस (Rain) किंवा हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय पंजाब, चंदीगड, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढील दोन दिवस जोरदार सरीसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा