Chhagan Bhujbal नाशिक : ओबीसींमध्ये आरक्षण (OBC Reservation) संपल्याची भावना आहे. मराठे आता ओबीसींचे वाटेकरी झाले आहेत.  ओबीसींमधील भावना चुकीची नाही. मराठा समाजाला कुणबीमध्ये टाकण्याची गरज काय? जर वेगळे आरक्षण देणार असाल तर त्याला आमचा पाठींबा असेल, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे.  


मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या सगेसोयरेसह प्रमुख तीनही मागण्या सरकारने मान्य केल्या. मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंच्या मागणीला शनिवारी तीव्र विरोध केला होता. आज त्यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना सरकारला घरचा आहेर दिला आहे.


पंचायतीत एक, दोन जण निवडून येत होते आता ते पण जाणार


कालच्या प्रकारानंतर मागासवर्गीय, दलित आणि इतर लोकांचे मेसेज येत आहे. पुढे काय करायचे विचारत आहे. आमचं आरक्षण संपलं अशी घबराट आहे. शिक्षण आणि नोकरीत समावेश होतोय. इतर ठिकाणीही वाटेकरी होणार आहेत. पंचायतीत एक, दोन जण निवडून येत होते आता ते पण जाणार अशी भीती ते व्यक्त करत आहेत. या भावनेत तथ्य आहे.


सगळीकडे एकतर्फी कार्यवाही


सर्वच मराठा समाजाला बॅक डोअर कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. शिंदे समिती नेमून क्युरेटिव्ह पिटीशनबाबत काम चालू ठेवायचे. सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. मराठा मागास आहे हे सुप्रिम कोर्टापर्यंत पोहचवायच आहे. गायकवाड आयोगाच्या अहवालावर सुप्रीम कोर्टाने बोट ठेवले होते. सुप्रीम कोर्टाने साखर कारखाने, संस्था आहे हा शेरा मारला आणि मराठा आरक्षण नाकारलं.  ते कसे मागास आहे हे दाखवायचा हा दुसरा प्रयत्न आहे. सर्व्हेक्षण करून पुन्हा मराठा आरक्षण द्यायचा प्रयत्न आहे. मात्र सगळीकडे एकतर्फी कारवाई केली जात आहे. क्युरेटिव्ह पिटीशन दाखल होण्यासाठी आमचा पाठिंबा आहे पण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायची गरज काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 


ओबीसी समाजही मतदान करतो हे सरकार विसरलंय


जर मराठा आरक्षण द्यायचे आहे तर त्याला आमचा पाठींबा आहे. पण सगळ्या मराठा समाजाला कुणबी मध्ये टाकण्याचे कारण काय? सरकारकडून हट्ट पुरवण्याचं काम सुरु आहे. पण, ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे. त्यात तथ्य आहे. ओबीसी समाजही मतदान करतो हे सरकार विसरले आहे, असेदेखील छगन भुजबळ म्हणाले.


छगन भुजबळ यांची ओबीसी नेत्यांसोबत आज बैठक


सरकारने मराठा आरक्षण अध्यादेशाचा मसुदा काढल्यानंतर आज छगन भुजबळ यांची ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. आज सायंकाळी ५ वाजता शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली आहे. आजच्या बैठकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. मराठा आरक्षण अध्यादेशाच्या मसुद्यावर ओबीसीसह इतर समाजातील बांधवांनी १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवा असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे.


आणखी वाचा


प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर बी प्राकच्या जागरण कार्यक्रमात चेंगराचेंगरी; एक महिला दगावली, तर 17 जखमी