Dada Bhuse on Nitesh Rane :  इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याकडे केली आहे. त्यासंबंधी त्यांनी अधिकृत पत्र दादा भुसे यांना दिले आहे. आता यावर मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  


नितेश राणे यांच्या वक्तव्यावर दादा भुसे म्हणाले की, कॉपीमुक्त परीक्षा हे आपल्या शिक्षण विभागाचं अभियान राहिलेलं आहे. कॉपी कुणी करणार नाही याची विभाग काळजी घेत आहे. परीक्षा केंद्रात कॅमेरे बसवलेले आहेत. पोलीस बंदोबस्त देखील आहे. पर्यवेक्षक आहेत, या सर्वांच्या माध्यमातून कोणी विद्यार्थी कॉपी करणार नाही याची विभाग काळजी घेत आहे. बुरखा घातलेला असू दे किंवा विना बुरखा घातलेला असू दे, कोणी विद्यार्थी कॉपी करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


महाराष्ट्राच्या प्रगतीकरिता सर्वांनी एकत्र यावे 


नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या तिढ्यावर दादा भुसे म्हणाले की, मला वाटतं, पालकमंत्रिपदाची मिडीयाला जास्त काळजी लागली आहे. आम्ही वारंवार सांगितले आहे की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वरिष्ठ पातळीवर चर्चा करतील. त्याप्रमाणे ते निर्णय करतील. महाराष्ट्राच्या प्रगतीकरिता सर्वांनी एकत्र आले पाहिजे. विरोधी पक्षांनी देखील एकत्र आले पाहिजे, असे त्यांनी यावेळी म्हटले. 


संबंधितांवर कठोर कारवाई करावी


मालेगाव हे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना भारतीय करण्याचा अड्डा असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. याबाबत दादा भुसे म्हणाले की,  बांगलादेशी लोकांना येथून कोणी अधिकाऱ्यांनी यांनी जर अशी खोटी कागदपत्रे दिली असतील. त्यांना भारताचे नागरिकत्व जर तुम्ही द्यायला लागले असेल. तर एक प्रकारे उद्याच्या भारताच्या स्वातंत्र्यालाच हा धोका आहे. ज्याने कोणी हे कृत्य केले असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. यावर कोणाचं काही दुमत असण्याचे कारण नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.


तर हे प्रकरण पुढे आले असते का?


किरीट सोमय्या हे वारंवार मालेगाव दौरा करत आहेत. याबाबत विचारले असता दादा भुसे म्हणाले की, ते भारताचे नागरिक आहेत. त्यांनी हा विषय पुढे आणला नसता तर माहिती उघड झाली असती का? त्यांच्याकडे अधिकची माहिती असेल आणि ते जर यासाठी येत असतील तर कोणाला वाईट वाटण्याचे काही कारण नाही. त्यांनी जर या प्रकरणी पुढाकार घेतला नसता तर हे प्रकरण पुढे आले असते का? तर हा प्रकार सर्रास चालू राहिला असता, असे त्यांनी म्हटले. 


हे देश विरोधी कृत्य


मॉयनॉरेटी डिफेन्स कमिटीकडून किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याला विरोध केला जात आहे. याबाबत विचारले असता मालेगावमधून जर बांगलादेशी रोहिंगे यांना जर भारताचे नागरिकत्व दिले जात असेल तर याचे समर्थन कोणी करू शकतं का? हे देश विरोधी कृत्य आहे. मला वाटतं या गोष्टी आपण जातीपातीच्या पलीकडे बघितल्या पाहिजे. देशाच्या विरोधात हे कृत्य असेल त्याचे समर्थन आपण कसे करू शकतो? असा सवाल दादा भुसे यांनी यावेळी उपस्थित केला.


आणखी वाचा 


Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी