(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Market Committee Election : 'अशा' मतदाराला एकापेक्षा अधिक मतदारसंघात मतदान करता येणार नाही, सहकार प्राधिकरणाचा आदेश
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतदानाला थोड्याच वेळात सुरुवात होणार असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने काढलेल्या आदेशामुळे खळबळ उडाली आहे.
Nashik Bazar Samiti Election : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती (Nashik Krushi Utpanan Bazar Samiti) निवडणुकीच्या मतदानाला (Voting) थोड्याच वेळात सुरुवात होणार असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने काढलेल्या आदेशामुळे खळबळ उडाली आहे. एका मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघांच्या अंतिम मतदार यादीत समाविष्ट असल्यास त्या मतदाराला एकापेक्षा अधिक मतदारसंघात मतदान करता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे सत्ताधारी गटातील अनेकांची गोची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान प्रक्रिया सुरु होण्यासाठी काही तास उरले असतानाच मतदानाचा अधिकार कुणाला आणि किती मतदान करता येणार याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने स्पष्टीकरण दिल्याने ऐनवेळी निवडणूक कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सहकारी संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी व अडते, तसेच हमाल व तोलारी मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून सदस्यांना निवडून दिले जाणार आहे. एका मतदाराचे नाव एकाच मतदारसंघाच्या अंतिम मतदारयादीत एकापेक्षा जास्त वेळेस समाविष्ट असले तरीही त्यास त्या मतदारसंघातून निवडून देण्यात येणाऱ्या सदस्य संख्येइतकेच मतदान करता येणार आहे. त्यामुळे त्यात एकापेक्षा अधिक मतदारसंघात मतदान करता येणार नाही.
दरम्यान बाजार समितीचे कार्यक्षेत्र असलेल्या तालुक्यांमधून अनेकांची नावे ही एकापेक्षा अधिक सोसायटीचे संचालक म्हणून समाविष्ट असतात. त्यांची नावे दोन ठिकाणचे संचालक मतदार म्हणून असले तरी त्यांना एकाच मतदारसंघासाठी मतदान करता येणार असल्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. मतदानाची प्रक्रिया अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने मतदानाच्या अधिकाराबाबत आता आदेश मिळाल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
नाशिक बाजार समितीचे चित्र काय?
नाशिक बाजार समिती देविदास इंगळे आणि शिवाजी चुंबळे यांच्या गटात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून दुसरीकडे दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून आलेल्या आदेशामुळे दोन्ही गटातील नेत्यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. त्यामुळे विशेष करुन सत्ताधारी गटातील अनेकांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
काय म्हटलंय आदेशात?
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी एल खंडागळे यांनी काढलेले आदेशानुसार, एका मतदाराचे नाव एकाच मतदारसंघांच्या अंतिम मतदार यादीत एकापेक्षा जास्त वेळ समाविष्ट झाल्यास संबंधित मतदारास संबंधित मतदारसंघात निवडून द्यावयाच्या सदस्य संख्याइतके मतदान करता येणार असल्यामुळे संबंधित मतदारास एकाच वेळी मतदान करता येणार आहे. तसेच मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघांच्या अंतिम मतदार यादीत समाविष्ट असल्यास त्या मतदाराला एकापेक्षा अधिक मतदारसंघात मतदान करता येणार नसल्याचं देखील आदेशात म्हटले आहे.
सत्ताधारी गटाला मोठा धक्का
दरम्यान राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या नव्या आदेशामुळे गोंधळ उडाला आहे. मतदारयादीत नाव असल्यामुळे संबंधित मतदाराला मतदानाचा अधिकार मिळतो; परंतु आता मतदाराला एकापेक्षा अधिक मतदारसंघातून मतदान करता येणार नसल्याने सत्ताधारी गटाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. चारही मतदारसंघात त्याचे नाव असले तरीही त्याला कोणत्या तरी एकाच मतदारसंघासाठीच मतदान करता येणार आहे. या निर्णयामुळे मतदार ऐन निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत आपले नाव असल्याने मतदारांनाच हक्क सांगू लागला तर प्रशासकीय यंत्रणेचीही चांगलीच धावपळ होणार आहे. विशेष म्हणजे मतदानाच्या तोंडावर घाईत आदेश काढण्यात आल्याने सत्ताधारी गटाला हा सर्वाधिक मोठा धक्का मानला जात आहे..