Nashik Crime News : दिंडोरी रोडवरील (Dindori Road) वज्रेश्वरी पाटाजवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातामध्ये लाकडी दांडके, कोयते घेऊन वाहनांची तोडफोड करणाऱ्या संशयितांना पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) ताब्यात घेतले. पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कामगिरी केली असून पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्या संशयितांची वरात काढली. 


याबाबत अधिक माहिती अशी की, वज्रेश्वरी पाटाजवळ, दिंडोरीरोड, नाशिक (Nashik News) येथे रिक्षामध्ये तक्रारदार सागर शांतीलाल फुलमाळी हे बसलेले असताना दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने लामखेडे मळ्याकडून एक इनोव्हा गाडी जोरात रिक्षाजवळ येऊन इनोव्हा कारमधून 5 ते 6 टवाळखोर हातात लाकडी दांडके, कोयते घेऊन खाली उतरले.  


अनेक वाहनांची तोडफोड


या अनोळखी इसमांनी तक्रारदार रिक्षात बसलेला असताना रिक्षाची समोरील काच फोडून, पाठीमागील बाजूच्या हुडवर, डाव्या बाजूस व उजव्या बाजूने कोयत्याने व दांडक्याने वार केले. तसेच रिक्षाच्या बाजूला असलेल्या इको गाडीच्या सर्व काचा फोडल्या. आयशर टेम्पोची समोरील काच फोडली, अॅपेरिक्षाची काच फोडली. अ‍ॅक्टिव्हा गाडीवर लाकडी दांड्याने मारून नुकसान केले. तसेच कुमावतनगर येथील रिक्षाचेदेखील नुकसान केले. 


टवाळखोरांना पोलिसांनी केले जेरबंद 


याबाबत तक्रारदार सागर शांतीलाल फुलमाळी यांच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गौरव एकनाथ थोरात (19), प्रतीक अनिल दोबाडे(21) यांना अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांचे साथीदार नितेश प्रल्हाद राऊत, चेतन भिकाजी गायकवाड, अविनाश प्रल्हाद राऊत यांना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात एका विधी संघर्षित बालकाचा देखील सहभाग निष्पन्न झाले आहे. त्यास ताब्यात घेऊन बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 


नाशिक पोलीस अ‍ॅक्शन मोडवर


दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचा वचक गुंडांवर राहिला नसल्याचा आरोप देखील पोलिसांवर होत आहे. परंतु पोलीसदेखील आता दहशत निर्माण करणाऱ्यांवर धडक कारवाई करताना दिसत आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी असाच प्रकार दिंडोरी रोडवरील माजी नगरसेवक उत्तमराव उगले यांच्या घराजवळ घडला होता. दहशत निर्माण करण्याच्या दृष्टीने अज्ञात युवकांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. पंचवटी पोलिसांनी दहशत निर्माण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या अन् पेठरोड दत्तनगर परिसरात त्यांची वरात काढली.


आणखी वाचा 


Ravindra Dhangekar: मोठी बातमी! आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ? मंत्री शंभूराज देसाईंवर केलेल्या आरोपांसंदर्भात मिळणार नोटीस