नाशिक : खते खरेदी करून पैसे न देता एकाने फर्टीलायझर कंपनीची (Fertilizer Company) सुमारे 51 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी (Nashik Police) एकास जेरबंद केले आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी रोशन गणेशराव मोरे (रा. वृंदावननगर, आडगाव शिवार, नाशिक) हे अक्षत फर्टीलायझर कंपनीचे बिझनेस हेड म्हणून काम पाहतात. त्यांनी आपल्या कंपनीचा माल विक्री करण्यासाठी घोटी रोडवरील रायगड कृषी उद्योग या दुकानाचे संचालक संशयित आरोपी सागर कैलास शिंदे यांच्याशी करार केला. 


पैसे न देताच आगाऊ खते घेतली


त्यादरम्यान आरोपी सागर शिंदे याने अक्षत फर्टीलायझर अॅण्ड प्लान्ट न्यूट्रिशियन कंपनीकडून आगाऊ खते घेतली. त्या बदल्यात पेमेंट अदा केले नाहीत. त्यानंतर पुन्हा शिंदे यांना 40 लाख 900 रुपये किमतीची खते दिली; मात्र शिंदे याने खते घेतल्याचे पेमेंट अदा केले नाही. दि. 31 मे 2019 ते दि. 28 मे 2024 यादरम्यान 40 लाखांची खते शिंदे यांना देण्यात आली. 


धनादेश दिला मात्र वटला नाही


त्यासाठी कंपनीकडून तगादा लावला असता शिंदे याने 51 लाख 27 हजारांचा धनादेश, थकित पेमेंट स्वरूपात दिला; मात्र हा धनादेश बँकेत वटू शकला नाही. हा प्रकार लेखानगर येथील हॉटेल ग्रॅण्डरिओ येथे घडला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपी सागर शिंदे याला अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 


शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक  


दरम्यान, शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून एका वृद्धास 60 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अमरनाथ विश्वनाथ मोरे यांना संशयित जीएफएसएल सर्व्हिस प्रोव्हायडर व जिओजित फायनान्शिअल सर्व्हिस लिमिटेड नावाच्या ग्रुपमधील वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील काही अज्ञातांनी फिर्यादी मोरे यांना एक लिंक पाठविली. ती लिंक ओपन करून शेअर मार्केट ट्रेडिंग करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर संशयितांनी मोरे यांना वेगवेगळ्या लिंकधारक व बँक खातेधारक यांच्या खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार मोरे यांनी संशयितांनी सांगितलेल्या विविध खात्यांवर सुमारे 60 लाखांची रक्कम ऑनलाईन जमा केली. रक्कम गुंतविल्यानंतर संशयिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोरे यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. 


आणखी वाचा 


Fake Currency : नाशकात सलग दुसऱ्या दिवशी बनावट नोटा सापडल्याने खळबळ, मोठं रॅकेट उघड होणार?