नाशिक: नाशिकच्या  ICICI होम फायनान्स या संस्थेच्या कार्यालयावर मोठा दरोडा (Robbery) पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये चोरट्यांनी 222 खातदेरांची लॉकर्स फोडून तब्बल 5 कोटी रुपयांचे दागिने पळवले आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये (Nashik) एकच खळबळ उडाली आहे. तर  ICICI होम फायनान्सच्या खातेधारकांमध्ये चिंता आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे. 


नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह चौकात ICICI होम फायनान्स या संस्थेचे कार्यालय आहे. मात्र, हा परिसर कायम गजबजलेला असतो. या परिसरात सतत लोकांची वर्दळ असते. मात्र, तरीही चोरट्यांनी याठिकाणी दरोडा टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संस्थेचे कार्यालय हे तिसऱ्या मजल्यावर आहे. त्यामुळे कोणालाही थांगपत्ता लागू न देता चोरटे तिथपर्यंत पोहोचले कसे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. 


सर्वेक्षणाच्या नावाखाली तहसीलदारांच्या घरी दरोडा; पोलिसांनी अवघ्या 60 तासांत लावला छडा


प्राथमिक माहितीनुसार, ही नाशिकमधील मोठी चोरीची घटना मानली जात आहे. चोरट्यांनी थोडेथोडके नव्हे तर तब्बल 222 खातेदारांची लॉकर्स फोडून त्यामधील दागिने लांबवले आहेत. या सोन्याच्या दागिन्यांची किंमत पाच कोटींच्या घरात आहे. शनिवारी संध्याकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. सध्या गुन्हे शाखा आणि पोलिसांकडून या चोरीप्रकरणाचा तपास सुरु आहे. या लॉकर्सच्या चाव्या मध्ये ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी वेगळाच संशय येत आहे. सीसीटीव्हीचा जागता पहारा आणि सिक्युरिटी तैनात असतानाही चोरट्यांनी ICICI होम फायनान्सच्या कार्यालयात शिरण्याचे धाडस कसे केले, याबाबत अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन दरोडेखोरांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. त्याआधारे आता सरकारवाडा पोलिसांनी दरोडेखोरांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे खासगी पतसंस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


पीपीई किट घालून चोरी


शुक्रवारी मध्यरात्री दोन चोर पीपीई किट घालून आले. त्यांनी अवघ्या 15 मिनिटांत 4 कोटी 92 लाखांचे तारण दागिने लंपास केले. हा दरोडा पडला तेव्हा पुढच्या दरवाजावर सुरक्षारक्षक होते. मात्र, चोर मागच्या खिडकीतून पळून गेले. सध्या गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. आता पोलीस किती तासांमध्ये चोरांचा छडा लावणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही


याप्रकरणी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीने चोरीच्या सखोल तपासासाठी पोलीस तक्रार दाखल केली आहे. आयसीआयसीआय होम फायनान्स सध्या सुरू असलेल्या तपासात अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे. ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही, अशी माहिती आयसीआयसीआयच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. 


आणखी वाचा


तुम्ही गपचूप झोपून रहा, घराची लाईट बंद करून घरवर दरोडा; आठ लाखांचा ऐवज लुबाडला