Nashik Lok Sabha Election 2024 : जुने नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर माजी आमदार वसंत गीते आणि भाजपच्या सत्ताधारी आमदार देवयानी फरांदे यांच्यात बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 


शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यासमोर (Bhadrakali Police Station) भाजपच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) आणि माजी आमदार वसंत गीते (Vasant Gite) यांचे समर्थक आमनेसामने आले. शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद शाळा केंद्रावर मतदान (Voting) झाल्यानंतर लोक उभे राहत असल्याची तक्रार फरांदे यांनी केली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या समर्थकांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 


देवयानी फरांदेंचा आरोप, विनायक पांडेंचा पलटवार  


तसेच ठाकरे गटाकडून पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केला.  तर मतदारांमध्ये उत्साह असल्यामुळे भाजपकडून बिनबुडाचे आरोप करत असल्याचा पलटवार माजी महापौर विनायक पांडे यांनी केला. नाशिकची निवडणुक निष्ठावान विरुद्ध गद्दार असल्याने भाजपकडून दांडशाहीचा वापर करत असल्याचा आरोपही विनायक पांडे यांनी केला आहे. 


पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात


यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून पांगविले. परिसरात गोंधळ व तणाव निर्माण झाल्याने मतदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. जे मतदार मतदान केंद्रात रांगेत उभे होते त्यांनी मतदान केंद्रातून पळापळ सुरू केली. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु झाली.


नाशिकमध्ये पहिल्या चार तासात 16.30 टक्के मतदान


नाशिक लोकसभा मतदारसंघात पहिल्या चार तासात 16.30 टक्के मतदान झाले आहे. यापाठोपाठ इगतपुरीत 17.33 टक्के मतदान झाले आहे. नाशिक पूर्व 16.81, देवळाली 16.5, नाशिक पश्चिम 16.24, तर सर्वात कमी मतदान नाशिक मध्य येथे 11.16 टक्के झाले आहे. 


राजाभाऊ वाजे, हेमंत गोडसे, शांतीगिरी महाराजांनी बजावला मतदानाचा हक्क


नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपल्या परिवारासह मतदान केले आहे. नाशिकमध्ये कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


आणखी वाचा 


गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकर्‍यांसह नेते मंडळी पोहचले मतदानाला; शेतकर्‍यांना पोलिसांनी अडवलं, नेमकं काय घडलं?