नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाणा (surgana) तालुक्यातील एका गावातून आगीची भीषण (Major Fire) घटना समोर आली असून पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत पोटचा गोळा गमावला. तर घरासह संपूर्ण संसाराची राखरांगोळी झाली. यावेळी आगीची घटना समजताच गावकऱ्यांनी घराकडे धाव घेत आग विझवण्यासाठी जीवाचं रान केलं मात्र एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल्याने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिकच्या (Nashik District) सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथे शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास दत्तू पाडवी यांच्या घराला आग लागली. आग लागल्यानंतर घरातील दोन्ही गॅस टाकींचा स्फोट होऊन यात त्यांचा मुलगा विजय दत्तू पाडवी याचा होरपळून जागीच मृत्यू झाला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील सर्व साहित्यासह तीन दुचाकी जळून खाक झाल्या. सकाळी साडेआठपर्यंत आग धूमसत होती. आग विझविण्यासाठी जवळपास कोणतीही यंत्रणा नसल्याने ग्रामस्थांनी हंडे, पिंप, हाती येईल त्या भांड्यात पाणी भरून डोक्यावर पाणी वाहून आणत आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले. या आगीत अंदाजे 14 लाख 27 हजारांचे नुकसान झाले असून आग कशामुळे लागली, याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.
पहाटेच्या सुमारास आग (Fire) लागल्यानंतर काही क्षणात घरातील दोन्ही गॅस टाक्यांचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर आगीत खाक झाले. याचबरोबर विजय पाडवी हा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने याचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीत दागिने, रोख रक्कम 70 हजार रुपये, संसारोपयोगी वस्तू असा एकूण 14 लाख 27 हजारांचे नुकसान झाल्याचे पाडवी कुटुंबीयांनी सांगितले. यावेळी घटनास्थळी धाव घेऊन तलाठी पालवी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनेत होरपळून मृत झालेल्या विजय पाडवी याच्यावर दुपारी दोन वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. याबाबत बाऱ्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ व राऊत तपास करत आहेत.
गावात अग्निशमन सेवा असणे आवश्यक
दरम्यान ग्रामीण भागात आगीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. अशावेळी ना मुबलक पाण्याची सोय, ना अग्निशमन दलाचे पथक अशावेळी यंग आटोक्यात आणणे कठीण जात असते. त्यामुळे ग्रामीण भागातील अधिक लोकसंख्येच्या गावात किंवा तालुक्याजवळील गावात अग्निशमन सेवा असणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे अनेक आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल. ग्रामीण भागातील नागरिकांकडे अपुऱ्या सोयीसुविधा असल्याने अशावेळी मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. एकाच घरात धान्य, रोख रक्कम, इतर साहित्य असते. त्यामुळे आग लागल्यास वेळेवर आग विझली नाहीतर लाखो रुपयांचे नुकसान त्या कुटुंबाला सोसावे लागते. या घटनेत तर कुटुंबातील एक माणूस गेल्याने पाडवी कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.
इतर महत्वाची बातमी :
Breaking News : अहमदनगरमध्ये आष्टी रेल्वेला भीषण आग, प्रवाशांना बाहेर काढल्याने जीवितहानी नाही