बंगळुरु : बंगळुरुमधील (Banglore) क्रांतिवीर संगोल्ला रायन्ना (केएसआर) या रेल्वे स्थानकावर शनिवार (19 ऑगस्ट) सकाळी उद्द्यान एक्स्प्रेसला (Udyan Express) आग लागली. या एक्स्प्रेसच्या दोन डब्यांमध्ये ही आग (Fire) पसरली होती. ही रेल्वे मुंबई (Mumbai) ते बंगळुरु स्थानकादरम्यान धावते. तसेच या रेल्वेचा केएसआर हे शेवटचे स्थानक आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी या रेल्वेमधून उतरल्यानंतर जवळपास दोन तासांनी या रेल्वेला आग लागली. त्यामुळे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. तसेच तज्ज्ञांकडून सध्या ही आग कशामुळे यासंदर्भात चौकशी केली जात आहे. 


रेल्वे स्थानकावर धुराचे लोट


या एक्स्प्रेसला आग लागल्यानंतर रेल्वे स्थानकावर एकच खळबळ माजली. सुरुवातील प्रवाशांना कसलीच कल्पना नसल्यामुळे एकच धावपळ सुरु झाली. रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट देखील पाहायला मिळाले. त्यामुळे स्थानकावर भीतीचे वातावरण निर्माण झाले. 






एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना लागली आग 


उद्यान एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. उद्यान एक्स्प्रेसच्या बी 1 आणि बी 2 या दोन कोचमध्ये ही आग लागली. ही एक्स्प्रेस केएसआर या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर उभी होती. सकाळी जवळपास 7:10 च्या सुमारास या गाडीमधून धुराचे लोट येऊ लागले. त्यानंतर या एक्सप्रेसमध्ये आग पसरल्याचं समोर आलं आहे. 


अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात देखील यश आले आहे. पण यामध्ये उद्यान एक्स्प्रेसचे दोन डबे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तर सुदैवाने मोठी दुर्घटना होता होता टळली. दरम्यान रेल्वे प्रशासनाने ही आग कशामुळे लागली याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु या आगीचे कारण अद्यापही समोर आले नाही. पण यासंदर्भात अधिक चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे तपासामधून आगीचं नेमकं कारण काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा : 


मुख्यमंत्र्यांसमोर फोनवर बोलणे अधिकाऱ्याला पडले महागात, प्रोटोकॉल भंग केल्याचा ठपका ठेवत थेट केली बदली