नाशिक : नाशिक ड्रग्ज प्रकरणानंतर (Nashik Drug Case) राज्यभरात एमडी ड्रग्जचं रॅकेट किती खोलवर रुजलंय याची प्रचिती हळूहळू समोर येत आहे. नाशिकचं (Nashik) नव्हे तर पुण्या मुंबईतही ड्रग्जचा व्यापार जोरात सुरु असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. मात्र हे ड्रग्ज रॅकेट चालतात कसे? ड्रग्ज निर्मितीपासून ते ग्राहकापर्यंत पोहचवण्यासाठी एक चैनच काम करत असल्याचे उघडकीस आले आहे. तुमच्या मोबाईलला जसा फक्त तुम्हाला माहित असलेला कोडवर्ड असतो, तसाच काहीसा प्रकार या ड्रग्ज रॅकेटमध्ये असल्याचे समोर आलं आहे. 


ललित पाटील (Lalit Patil) प्रकरण त्यानंतर राज्यात अनेक जिल्ह्यात एमडी ड्रग्ज विरोधात (MD drugs) होणारी कारवाई आणि त्यावरून रंगलेल्या राजकारणामुळे एमडी ड्रग्ज हा सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतो आहे. मात्र या एमडी ड्रग्जचा व्यापार नक्की कसा चालतो हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नाशिक अमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेने मागील दोन आठवड्यात सात ड्रग्ज पेडलरला अटक केली असून यातील एक आरोपी हा मुंब्राचा (Mubra) आहे तर बाकी नाशिकचेच असून अनेक जण सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी ड्रग्ज कुठून आणले? कोणाला विकले? याचा तपास सध्या केला जातो आहे. ललित पाटील, भूषण पाटील तसेच अभिषेक बलकवडे यांच्या हे संपर्कात होते का? या दिशेने देखील पोलीसांचा तपास सुरू आहे. 


दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार एमडी ड्रग्ज खरेदीपासून (MD drugs Purchase) ते विक्रीपर्यंत म्हणजेच व्यवहार ठरवणारा, माल विकत घेऊन येणारा, हातात माल देणारा तसेच खरेदीदाराकडून प्रत्यक्षपणे पैसे घेणारा वेगवेगळा असतो, एखाद्या सिनेमात आपण बघतो, त्याचप्रकारे ही एक मोठी साखळीच काम करत असते, अशी चर्चा आहे. हा सर्व व्यवहार रोखीने चालतो, तिथे शक्यतो ऑनलाईन व्यवहार होत नाहीत. ड्रग्ज ज्या ठिकाणी तयार होते, तिथून जर एक ग्रॅम ड्रग्ज 800 रुपयांना खरेदी केले असतील तर प्रत्यक्ष खरेदीदाराकडे पोहोचेपर्यंत त्याची किंमत 1800 ते 2200 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचते. व्यवहार करतांना शक्यतो सांकेतिक भाषेत बोलले जाते, कुठे एमडी ड्रग्जला दवा म्हणतात तर कुठे माल, चीज, म्याव म्याव म्हणून त्याला संबोधले जाते. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे व्यक्ती या व्यवसायात उतरतात आणि अल्पावधीतच भरपूर पैसा कमावतात.


तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात.... 


ड्रगचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई अडकत चालली आहे. कॉलेजमधील तरुण तरुणीना ड्रग्सच्या जाळ्यात ओढण्यासाठी ड्रग्ज विक्रेते सावज शोधून ड्रग्ज विक्री करत असल्याचे देखील समोर आले आहे. एकीकडे धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये चक्क ड्रग्ज निर्मितीचा कारखानाच उभा होता. या कारखान्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज निर्माण केलं जात होत. नाशिकच्या तरुणाईला ड्रग्जच्या आहारी घालवलं जात होत, शिवाय मुंबई, पुणे आणि राज्यासह देशभरात हे ड्रग्ज पुरवलं जात असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येतो आहे. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. त्यामुळे काही वर्षात कुठे कुठे आणि कसं कसं ड्रग्ज जाळ पसरलं असेल याचा पोलीस शोध घेत आहेत, मात्र ही चेन काही साधी नसल्याचे देखील या निमित्ताने अधोरेखित होत आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Video: जिन्यावरून पडल्याचे नाटक, ललित पाटीलचा आणखी एक ड्रामा समोर; 2020 चा एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती