नाशिक : उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना टँकरने (Accident) धडक दिल्याने शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मालेगाव येथे घडली. ऐन रक्षाबंधन (Rakshabandhan) सणाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात या विद्यार्थ्याच्या आईचा पाय निकामी झाला आहे. या घटनेनंतर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मनपा व पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध करत धरणे आंदोलन करण्यात आले.
नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. सततच्या घडणाऱ्या घटनांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागत असल्याचे समोर येत आहे. अशातच बिहार राज्यातून मालेगावात उदरनिर्वाहानिमित्त आलेले हरिराम जयस्वाल हे परिवारासह सोयगावात वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा आलोक याला पोटात त्रास होत होता. त्यामुळे त्याचे काका व आई हे मंगळवारी दुचाकीने मोसम पुलावरून (Mosam Pull) दवाखान्याकडे जात होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात टँकरने दुचाकीला अक्षरशः फरफटत नेले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या आलोक आणि त्याच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान आलोक याला वाचविण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू असताना त्याचा बुधवारी त्याचा दुर्दैवी मृत्यू (Youth Death) झाला. रक्षाबंधनाच्या त्याची प्राणज्योत मालवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आलोक जयस्वाल याचा मृत्यू झाल्याच्या घटनेला महापालिका, पोलिस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत या घटनेच्या निषेधार्थ मालेगावकरांनी रस्त्यावर येत प्रशासनाचा निषेध केला. मोसम पुलाजवळील महात्मा गांधी पुतळा येथे आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीसह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी गौरव जयस्वाल याला श्रद्धांजली अर्पण करत धरणे आंदोलन केले.
मालेगावात संघटनांकडून आंदोलन
मालेगाव (malegaon) येथील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मनपा व पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दांत घटनेचा निषेध करत महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. रहदारीचे कुठलेही नियोजन नसतांना विकास कामाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरणे बंद करावे. झालेली जीवित हानी ही प्रशासन व प्रशासनावर नियंत्रण ठेवणारे लोकप्रतिनिधी त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, शहरातून वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी ,अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. या आंदोलनात विविध राजकीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.