औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील वरखेड गावाजवळ नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पाटात एक छोटा हत्ती पडून एक जण ठार तर तीन वर्षीय मुलगी पाण्यात पडून वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीची शोध मोहीम सुरू आहे. मंगळवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, यात वरखेड येथील सुधाकर अशोक वैराळ (वय 28 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची मुलगी श्रद्धा वैराळ (वय 3 वर्षे) ही पाण्यात पडून बेपत्ता झाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर गावकऱ्यांच्या मदतीने या बेपत्ता मुलीचा शोध घेण्यात येत आहे. 


अधिक माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील वरखेड येथील सुधाकर अशोक वैराळ हे मंगळवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या छोटा हत्तीमध्ये बसून आपल्या मुलीसह घरी जात होते. दरम्यान, वरखेड गावाजवळील त्यांचा छोटा हत्ती अचानक नांदूर मधमेश्वरच्या प्रमुख पाटातील पाण्यात पडला. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीचं पाणी सोडण्यात आल्याने पाटात मुबलक वाहते पाणी आहे. या पाण्यात छोटा हत्ती पडून तीन वर्षीय श्रद्धा वाहून गेली, तर सुधाकर वैराळ गंभीर जखमी झाले. उपस्थित ग्रामस्थांनी जेसीबीच्या साह्याने छोटा हत्ती पाण्याबाहेर काढला. जखमी वैराळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरानी त्यांना तपासून मृत घोषित केले.


गावकरी मदतीला धावले...


सुधाकर वैराळ यांची छोटा हत्ती कालव्यात पडल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि गावकरी तत्काळ मदतीला धावून आले. जेसीबी मागवून गाडी बाहेर काढण्यात आली. मात्र, यावेळी फक्त सुधाकर वैराळ हेच गंभीर जखमी अवस्थेत मिळून आले. त्यामुळे रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र या ठिकाणी डॉक्टरानी सुधाकर अशोक वैराळ यास तपासून मृत घोषित केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. अशोक वैराळ यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असून यातील एक मुलगी केवळ 12 दिवसाची आहे. त्यांच्या जाण्याने वैराळ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.


मुलीचा शोध सुरु...


सुधाकर वैराळ यांची छोटा हत्ती कालव्यात पडल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. पण याचवेळी त्यांच्यासोबत असलेली त्यांची तीन वर्षांची मुलगी श्रद्धा मात्र पाण्यात वाहून गेली आहे. गावकरी आणि पोलिसांकडून तिचा शोध घेतला जात आहे. मात्र, कालव्यात पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने अडचणी येत आहे. रात्री उशिरापर्यंत श्रद्धाचा शोध लागला नव्हता. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


धक्कादायक! सडलेल्या थर्माकोलच्या तराफ्यावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, अंगावर शहारे आणणारा भिवधानोरा गावकऱ्यांची कहाणी