नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिसांकडून (Nashik Rural Police) जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम सुरु आहे. यात महिला पोलीस देखील गावागावांत जाऊन, डोंगर दऱ्यांतून शिरून गावठी दारूच्या अड्ड्यांवर कारवाई करत आहेत. जिथे जिथे गावठी हातभट्ट्या दिसून येतील, त्या ठिकाणी महिला पोलीस (Women Police) जंगलात सुरू असलेले हातभट्टीचे अड्डे (Illegel Liqour) नेस्तनाबूत करत आहेत. या कामगिरीचे जिल्हाभरात कौतुक होत आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या हातभट्टी व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांनी महिला पोलीसांची 04 पथके गठीत केली होती. जागतिक आदिवासी दिन (Trible Day) आणि क्रांती दिनाचे औचित्य साधून 09 ऑगस्टपासून ग्रामीण पोलीसांच्या या महिला अंमलदार हातभट्टी व्यवसायांच्या निर्मूलनासाठी पुढे सरसावल्या आहेत. प्रत्येक पथकात आठ महिलांचा समावेश करण्यात आला होता. गेल्या तीन आठवड्यांत सदर महिला पोलीसांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील छुपे हातभट्टी अड्डे शोधून एकूण 32 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. तर 33 संशयितांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. 


दरम्यान, जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), पेठ भागांत अधिक कारवाया करण्यात येत असून ग्रामीण पोलीसांच्या महिलांनी केलेल्या या कार्यवाहीत एकूण 33 आरोपीतांविरुद्ध मुंबई दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात आजवर एकूण 11 लाख 94 हजार 170 रुपयांची गावठी हातभट्टीची दारू, रसायन आणि साहित्य साधने हस्तगत करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या महिला अंमलदारांच्या सदर कारवाईचे ग्रामीण भागातील महिलांकडून स्वागत होत असून अशा महिला भगिनी देखील ग्रामीण पोलिसांना कारवाईसाठी सहकार्य करत आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या हातभट्टी व्यवसायांच्या निर्मुलनासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांची सदर महिला पथके यापुढेही कार्यरत राहणार असून जिल्ह्यातील पोलीस पाटलांना त्यांना आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


तर इथे साधा संपर्क.... 


गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण पोलिसांकडून धडक मोहीम सुरु असून अशा प्रकारे अवैध व्यवसाय (Illegal business) आपल्या भागात सुरू असल्यास यासाठी पोलिसांकडून हेल्पलाईन नंबर देखील कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांना अवैध व्यवसायाविषयी काही माहिती असल्यास त्यांनी ती नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायास प्रतिबंध घालण्याकामी सुरू केलेल्या हेल्पलाईन क्रमांक 6262 256363 यावर देऊन सदर महिला अंमलदारांच्या कामगिरीस हातभार लावावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.


अंमली पदार्थ विरोधी अभियान


नाशिक ग्रामीण पोलीसांनी 06 ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान अंमली पदार्थ विरोधी अभियान राबवले होते. या कालावधीत एकूण 10 कारवाया झाल्या असून यात एकूण 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीतांकडून सुमारे 12 किलो गांजा आणि 2305 अल्प्राझोलम गोळया असा एकूण 1 लाख 68 हजार 136 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर कारवाया मालेगावमधील पवारवाडी, किल्ला, मालेगाव शहर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तर नाशिक तालुका, चांदवड, सायखेडा, सिन्नर, सिन्नर एमआयडीसी व यावी या इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik Police : गावठी दारू विक्रेत्यांना पळता भुई थोडी, पाचशे पोलिसांचे एकाचवेळी छापे, दहा लाखांची दारू जप्त