नाशिक : मागील काही दिवसांपूर्वी टोमॅटोला (Tomato Rate) उच्चांकी भाव मिळत होता. त्यावेळी समाधान होते. मात्र सद्यस्थितीत टोमॅटो दहा रुपये किलोने विकला जात असल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये आंदोलन करण्यात येत असून दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारासमोर टोमॅटो रस्त्यावर फेकले. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवला. 


नाशिक जिल्ह्यात (Nashik District) कांद्यापाठोपाठ (Onion Farmers) टोमॅटोचे पिकाचे मोठ्या प्रमाणात (Tomato Crop) उत्पादन घेतले जाते. गेल्या महिन्यात 200 रुपये किलो अशा चढ्या दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोला आता कुणीही 'भाव' देत नसल्याचे चित्र आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात टोमॅटोला किलोला 200 रुपये किलो भाव मिळत होता. त्यामुळे शेतकरी समाधानी होता, मात्र हे समाधान अल्पकाळ टिकले. सध्या प्रति जाळी 70 ते 100 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी नाशिकच्या दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती (dindori Bajar Samiti) आवारासमोर टोमॅटो रस्त्यावर फेकले..यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे नाशिक- कळवण रस्त्यावरील दिंडोरी बाजार समितीच्या आवारात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. 


नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आस्मानी सुलतानी संकट थांबण्याच नाव घेत नसून तब्बल 13 दिवसानंतर कांद्याचे लिलाव सुरू झाल्याने कांद्या उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र अशातच आता टोमॅटो उत्पादक (Tomato Farmers) शेतकरी संकटात सापडला आहे. एकीकडे मागील महिन्यातच टोमॅटोला चांगला दर मिळत असताना आज कवडीमोल दरात टोमॅटो विक्री केला जात आहे. तब्बल दहा रुपये किलो दराने किरकोळ बाजार विक्री सुरु असून  प्रति जाळी 70 ते 100 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून दिंडोरी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत टोमॅटोचा लाल चिखल केला. दोन दिवसांपासून ऊन वाढत असल्याने टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असल्याने भाव कोसळले असल्याचे सांगितले जात आहे. 


द्राक्ष बागा तोडून टोमॅटोचे उत्पादन 


दरम्यान जिल्ह्यातील अनेक शेतकरी द्राक्ष पीक घेत होते, मात्र मागील वर्षी द्राक्षाला भाव मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागा तोडून टोमॅटो पीक घेतले. एकट्या दिंडोरी तालुक्यात सुमारे सात हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड आहे. टोमॅटोसाठी शेतकऱ्यांना एकरी दीड लाखापर्यंत खर्च येतो. परंतु, उत्पन्न रुपयात मिळत असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. आता जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा माल बाजारात येत असल्याने अशातच दर कोसळले असून दहा रुपये किलो दराने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकल्याचे समोर येत आहे. 


 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Tomato : कांदा पाठोपाठ टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत, टोमॅटो शेती प्लॅस्टिक व्हायरसच्या विळख्यात, काय आहे प्लॅस्टिक व्हायरस?