Nashik News : सप्तशृंगी देवी विश्वस्त संस्थानने (Shree Saptashrungi Nivasini Devi) भाविकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.  नवरात्रोत्सवात भाविकांना सप्तशृंगीदेवी चे  24 तास दर्शन खुले राहणार आहे. सर्व शासकीय अधिकारी, सप्तशृंग निवासिनी ट्रस्ट विश्वस्त, व्यवस्थापक ग्रामपंचायत आदींच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. 


नवरात्रीत राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत आहेत. दरम्यान या कालावधीत गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता  सप्तशृंगगड येथे सप्तशृंगी देवीची दर्शन व्यवस्था 24 तास सुरू राहणार आहे. भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेवून विश्वस्त संस्थेने श्री भगवती - श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर हे  15 ते  24 ऑक्टोबरपर्यंत  दर्शनासाठी 24 तास खुले ठेवून भाविकांना श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


दररोज 40 ते 50 हजार भाविक दर्शनासाठी हजेरी लावण्याची शक्यता


दरवर्षी नवरात्रीत दर्शनासाठी येणाऱ्या पायी पालख्या, भाविक यामुळे गडावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सप्तशृंगी देवी मंदिर हे 24 तास भाविकांना दर्शनासाठी सुरू ठेवण्यात येत आहे. नवरात्रोत्सव काळात खाजगी वाहनांना गडावर बंदी असणार आहे. नांदुरीगड पायथ्याशी येथे बसस्थानक व वाहनतळ उभारण्यात येणार आहे.  नवरात्रोत्सव काळात दररोज 40 ते 50 हजार भाविक दर्शनासाठी हजेरी लावण्याची शक्यता आहे.  विविध विभागांनी यात्रा कालावधीत वाटून दिलेली जबाबदारी चोख पार पाडण्याचे आदेश प्रांताधिकारी विशाल नरवडे यांनी दिले आहेत.  


भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन


दरम्यानच्या कालावधीत भाविकांनी 24 तास दर्शन व्यवस्था सुरू असेल, याची नोंद घेवून गर्दीचा कालावधी टाळून पर्यायी दर्शन सुविधेच्या उपलब्ध वेळेचा विचार करता आपल्या निर्धारित वेळेत सप्तशृंगी देवी दर्शनासाठी येवून मंदिर व्यवस्थापनास योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ


साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगी देवीचा मोठा भक्त वर्ग आहे.  साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून आणि खान्देशवासियांचे कुलदेवी आहे.  सप्तशृंगी देवीला श्री भगवती माता म्हणून ओळखले जातात, तर कुणी वणीची देवी म्हणून देखील ओळखतात. नवरात्रात लाखो भाविक पायी दर्शनाला येत असतात.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवीचा गडावर  खान्देशसह, अहमदनगर, नाशिक, पुणे, औरंगाबाद येथून  भाविक येतात.   सप्तशृंगी देवीची स्वयंभू मूर्ती असल्याचे सांगतात, त्यामुळे नवसाला पावणारी देवी असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.


हे ही वाचा :