नाशिक : महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी (Elimination of superstitions) कायदा केला, पण काही उपयोग नाही. आजही जास्तीत जास्त लोक अंधश्रद्धेच्या आपणच जात आहोत. त्या बागेश्वर महाराजाकडे 5 लाख लोकं जातात, अलीकडेच पुण्यात हजारो महिला अथर्वशीर्ष म्हणायला रस्त्यावर दिसल्या, पण रस्त्याच्या पलीकडे फुलेवाडा, फुलेंची शाळा आहे तिथं नतमस्तक व्हायला कोणी गेलं नाही, अशी खंत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली. 


नाशिक (Nashik) शहरात सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा.हरी नरके (Hari Narke) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सत्यशोधक समाजाचे 41 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन जेजुरकर लॉन्स नाशिक येथे पार पडले. या अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी छगन भुजबळ बोलत होते. सत्यशोधक समाज महात्मा फुलेंच्या (Mahatma Fule) प्रेरणेतून सुरु झालं आणि यामुळे धार्मिक किंवा जातीय मुजोरी करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात आळा घालण्याचं काम सत्यशोधक समाजाने केलं. सबंध समाजामध्ये अवैज्ञानिक परंपरा, अंधश्रद्धा, स्त्री दास्य पद्धती, अमानवी व माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार देशात सुरु होते. यावेळी भगवान गौतम बुद्धांनी याला विरोध करून सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. धार्मिक आणि सामाजिक सुधारणा असा दुहेरी भाव सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून मांडला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.


छगन भुजबळ पुढे म्हणाले की, महात्मा फुलेंबाबत कोणी चुकीचे बोलले की त्यांना सडेतोड उत्तर द्यायचे. अनेक धमक्या आल्या, पण त्याला ते घाबरले नाही.  ते गेल्याने फार मोठे नुकसान सत्यशोधक समाजाचे झाले आहे.  अलीकडे हरी नरके यांनी चांगले काम केले. मात्र ते गेल्यामुळे पोकळी निर्माण झाली असून त्यांची आठवण काढल्यावर आजही हातपाय गळून जातात. हळूहळू दलित समाज बराचसा अंधश्रद्धा, कर्मकांडाच्या बाहेर आला आहे. मात्र, दुसरीकडे पुण्यात (Pune) हजारो महिला अथर्वशीर्ष म्हणायला रस्त्यावर दिसल्या, त्याच पलीकडे रस्त्याच्या पलीकडे फुलेवाडा (FuleWada), फुलेंची शाळा आहे, तिथे नतमस्तक व्हायला कोणी गेले नाही, मी काही बोललो तर समाजमाध्यम बडवून काढायला आहेच, जास्तीत जास्त अंधश्रद्धेच्या मागे आपणच जात असल्याचे म्हणाले. महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धेबाबत कायदा केला, पण काही उपयोग नाही, अशी खंत भुजबळांनी बोलून दाखवली. 


सत्तेत नसाल तर अवकळा होतील... 


आरक्षण मुद्द्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, सत्तेत नसाल तर अवकळा होतील, असं फुले म्हंटले होते, तर बाबासाहेब सत्तेत गेले म्हणून, त्यांनी संविधान लिहिले. या सगळ्यांचा विचार आपण करायला हवा, तुम्ही फक्त माळी माळी, वंजारी वंजारी करून चालणार नाही, फक्त सुतार, माळी म्हणून काही मिळणार नाही तर ओबीसी म्हणून काय तर मिळेल, याचा विचार करायला हवा, एवढा मोठा समाज असून सुद्धा काही अडथळे आले तर कोण येत? मला किती शिव्या पडतात, कधी तर तो मोबाईल नको असं होते, पण लढावंच लागेल, असं सांगत आरक्षण मिळण्यासाठी, वाचवण्यासाठी कोणी येत नाही, असेही भुजबळ म्हणाले. मुख्यमंत्र्यांना आपण सांगितले, तुम्ही महाराष्ट्राचे राजे आहात, सर्व प्रजा तुम्हाला सारखी आहे. एकाच समाजासाठी तुम्ही तुमची शक्ती वापरता कामा नये. पवार साहेब, राहुल गांधी सगळेच म्हणतायत ओबीसींना आरक्षण मिळावे, त्यामुळे तुम्ही सर्वानी एकत्र येणं आवश्यक असल्याचे आवाहन भुजबळ यांनी यावेळी केले. 


इतर महत्वाची बातमी : 


Chhagan Bhujbal On Maratha Reservation : मराठा आरक्षणामुळे  ओबीसींना फटका  बसू नये : छगन भुजबळ