Pune SPPU Atharvashirsh course : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अथर्वशीर्षाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात घेण्याचे आणि धार्मिक शिक्षण देण्याचे जोरदार समर्थन केले आहे. तर हरी नरके आणि छगन भुजबळ यांच्याकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता गणपतीचं अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात आणलं. उद्या शंकर, पार्वती, तीस कोटी देवाचं ही अभ्यास सुरु करा. बाकीचं शिक्षण बंद करा. हेच शिकत बसलंं कशा नोकऱ्या लागतील. हे सगळं मुद्दाम केलं जातं आहे. यांच्याविरोधात आवाज उठवावा लागेल. कोणाची परवानगी नसताना हा प्रकार सुरु आहे, असा घणाघात मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.


पुणे विद्यापीठात गणपतीचं अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांंना आता अथर्वशीर्ष शिकवल्या जाणार आहेत. सर्वसामान्य मुलांनी अथर्वशीर्ष शिकावं आणि यांची मुले परदेशात शिकणार, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. अथर्वशीर्ष पठण हे अभ्यासक्रमात घ्यायला हवं हे आपोआप कसं कळतं. तसं असेल तर मग महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रार्थना अभ्यासक्रमात घ्यायला हवी. हे त्यांना का कळत नाही?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अथर्वशीर्षाचा अभ्यासक्रमात समावेश होणार आहे. त्यावरुन संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


हरी नरकेंचाही विरोध
गणेश अथर्वशीर्षच अभ्यासक्रमात समावेश केलाय, आमचा या निर्णयाला विरोध नाही. फक्त कायद्याचं उल्लंघन करुन हा निर्णय घेतलाय, ते आम्ही चालू देणार नाही. सिनेट अस्तित्वात नसताना हे कसं काय लागू झालं. शिवाय हंगामी कुलगुरु हा निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यात याला मार्क ठेवलेत आणि सक्तीचा विषय नाही असं म्हणून हे लबाडी करत आहेत, असं म्हणत हरी नरके ज्येष्ठ विचारवंत यांनी विरोध दर्शवला आहे. 



इंजिनिअरींग आणि फार्मसी सोडून द्यायचं ?
अभ्यासक्रम ठरवणारी अभ्यास समिती अस्तित्वात नाही. सर्वच धर्मांच्या प्रार्थना आहेत. त्याही शिकवाव्या लागतील. या प्रार्थना शिकवून काय मिळाणार असल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांनी इंजिनिअरींग आणि फार्मसी सोडून द्यायचं आणि हे शिकत बसायचं का? यातून मन:शांती मिळणार आहे का?, असा प्रश्न छगन भुजबळांनी उपस्थित केला आहे.


चंद्रकांत पाटलांचं समर्थन
नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारच्या अभ्यासक्रमाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्या प्रकारे विद्यापीठात हा अभ्यासक्रम असेल. हा अभ्यासक्रम ऑप्शनल असेल. बंधनकारक नाही. अथर्वशीर्ष विद्यापीठात शिकवणे यात गैर काही नाही. ते गुन्हेगारांचे, दाऊदचे उदात्तीकरण नाही तर गणपतीची प्रार्थना आहे. धार्मिक शिक्षण विद्यापीठात देण्यात गैर काही नाही, असं मत व्यक्त करत अथर्वशीर्षाच्या अभ्यासक्रमाला शालेय शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समर्थन दर्शवलं आहे.