नाशिक : 'डॉ. बाबासाहेबांचे विचार डोळ्यासमोर होते, आई-वडिलांची साथ होती, अपयश आले, पण खचले नाही, एकवेळ अशी आली की नातेवाईकांचे टोमणे खावे लागले, पण ध्येयाशी कधीही तडजोड केली नाही, ध्येय निश्चित होतं, सातत्य होतं, शेवटी करुन दाखवलं' अन् आज एकाचवेळी दोन दोन पोस्ट मिळाल्यानंतर कुटुंबीयांना आनंद झालाच, शिवाय नातेवाईकांनी सुद्धा तोंडभरून कौतुक केलं, ही यशोगाथा आहे, नाशिकच्या सोनाली पगारे (Sonali Pagare) यांची.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यातील उमराळे हे सोनाली पगारे यांचे गावं. अगदी शेती मातीचा वारसा असलेले उमराळे गावं, सोनाली पगारे यांचे आई-वडीलही शेतीच करतात, घरात चार मुली, पण कुणालाच शिक्षण कमी पडू दिलं नाही. सोनाली यांचं प्राथमिक शिक्षण उमराळे जिल्हा परिषद शाळेत झालं, तर माध्यमिक शिक्षण जनता विद्यालयात घेतले. यानंतर काय करावं म्हणून नाशिकच्या (Nashik) सामनगाव येथील पॉलिटेक्निक कॉलेजला 2014 मध्ये अॅडमिशन घेतलं. त्यानंतर मॅकेनिकलमधून 2017 ला डिग्री पूर्ण केली. याच काळात आरटीओची परीक्षा (MPSC RTO Exam) दिली, याआधी एमपीएससीची काहीच कल्पना नव्हती, मात्र अभ्यास असल्याने पूर्वपरीक्षा पास केली. मात्र मेन्स परीक्षेसाठी दुचाकीचा परवाना नसल्याने बसता आले नाही.
तू करुन दाखवलंस; आई-वडिलांची प्रतिक्रिया
त्यानंतर तब्बल वर्षभर एका खासगी कंपनीत काम करुन अभ्यास सुरु ठेवला. मात्र नोकरी करुन अभ्यासाला वेळ देता येत नव्हता, शेवटी पुन्हा अभ्यासिकेत प्रवेश घेऊन पूर्णवेळ अभ्यासाला देण्यास सुरुवात केली. त्यानुसार 2020 मध्ये महाजेनको जाहिरात आली. या परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. त्यानुसार मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरु केला. मात्र मध्यंतरी कोरोनाची दोन वर्ष गेल्याने नैराश्य आले. याच काळात नातेवाईकांनी सल्ले देण्यास सुरुवात केली, मात्र खचले नाही. अभ्यास सुरुच ठेवला होता. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये मेन्स परीक्षा झाली, यात चांगल्या गुणांनी यश संपादन केले. त्यानंतर यंदा फेब्रुवारी 2023 ला या परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन ज्युनिअर इंजिनिअरसह सहाय्यक इंजिनिअरसाठी निवड झाली आहे. हा निकाल जेव्हा कुटुंबियांना सांगितला, तेव्हा त्यांचा आनंद पाहण्यासारखा होता. 'आम्हाला माहिती होतं, तू ते करुन दाखवलंस' अशी पहिली प्रतिक्रिया आई-वडिलांनी दिल्याचे सोनाली यांनी सांगितले.
अतिशय कष्टातून हे यश मिळालं
दरम्यान या निकालानंतर सोनाली पगारे म्हणाल्या की, 'अतिशय कष्टातून हे यश मिळालं आहे, तुमची जिद्द, तुमच्या ध्येयाची सतत आठवण करुन आयुष्यातील एखादा प्रसंग, आई-वडील या सगळ्या गोष्टी महत्वपूर्ण ठरल्या. मला डॉक्टर व्हायचं होत, पण या क्षेत्रात अपघाताने आले. खरंतर बहुतांश मुलींना कुटुंबीय, नातेवाईकांमुळे दोन किंवा तीनच वर्षं अभ्यासासाठी मिळतात, त्या काळात मुलींना पद मिळालं नाही, तर त्यांची कुटुंबियांची चिंता वाढत जाते. मीही त्याला अपवाद नव्हते. या काळात सुदैवाने मित्रमैत्रिणी चांगले मिळाले. आम्ही सगळे खूप मनापासून अभ्यास करायचो. आणि आज दोन दोन परीक्षेत यश मिळवलं. तत्पूर्वी आयटीआय महाविद्यालय प्राध्यापकपदाची परीक्षा देखील उत्तीर्ण असून या परीक्षेचा अंतिम निकाल येणे बाकी आहे, मात्र तत्पूर्वी महाजेनकोत निवड झाल्याने खूप भारी वाटतंय, भविष्यात यूपीएससी देण्याचा विचार असल्याचे सोनाली यांनी सांगितले.
इतर महत्वाची बातमी :