नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रमुख तीन मागण्या असून त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर यावर विचार करावा, अन्यथा येत्या काही दिवसांत दिल्लीला धडक देऊ, असा इशारा महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं दिला. त्यामुळे व्यापारी वर्गानंतर आता आता शेतकरी कांदा प्रश्नावर आक्रमक झाला आहे. 


नाशिकमधील (Nashik) कांदा लिलाव बंदचा आज सहावा दिवस असून व्यापारी मागण्यांवर ठाम आहे. दुसरीकडे, या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील शेतकरी संघटनांनी (Farmers) बैठक बोलावली होती. आज लासलगावमध्ये (Lasalgaon) जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकत्रित बैठक पार पडली. त्यानुसार येवला, चांदवड, निफाड, नांदगाव आदी तालुक्यातील शेतकऱ्यांना बैठकीला हजेरी लावली. यावेळी गेल्या सहा दिवसांपासून कांदा लिलाव (Onion auction) ठप्प असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शिवाय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घामाचा भाव मिळाला पाहिजे, ज्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, त्या पूर्ण व्हायलाच पाहिजे, एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना सरकार काय करतय असा सवाल शेतकऱ्यांनी बैठकीत उपस्थित केला. 


शेतकऱ्यांच्या तीन मागण्या काय आहेत?


या बैठकीत शेतकरी संघटनेकडून प्रमुख तीन मागण्या सरकारकडे केल्या आहेत. कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क हटवणे, नाफेड (NAFED) व एनसीसीएफचा कांदा बंद करणे तसेच उर्वरित कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट जमा करावे, या मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या आहेत. सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा लवकरच महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनांकडून दिल्लीला धडक देऊ असा इशारा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे (Bharat Dighole) यांनी दिला. त्यामुळे एकीकडे कांदा व्यापारी असोसिएशन आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने गेल्या सहा दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहे. व्यापाऱ्यांचा बंद कायम असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र आहे. 


दरम्यान, उद्या व्यापारी व पणनमंत्र्यांच्या बैठकीत या मागण्या मान्य न झाल्यास थेट दिल्लीत ठिय्या मांडत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीत राज्य व केंद्र सरकारला देण्यात आला. दरम्यान, या बैठकीपूर्वी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्यातील पदाधिकारी यांनी लासलगाव येथे दाखल होत बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 


उद्या होणाऱ्या बैठकीवर लक्ष 


दरम्यान, कांदा व्यापारी वर्गाने गेल्या बुधवारपासून संप पुकारला असून कांदा लिलाव ठप्प आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर व्यापाऱ्यांनी बैठक घेतली, मात्र आपल्या निर्णयावर ठाम असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. आता उद्या मंगळवारी पणन मंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. यात नेमका काय निर्णय होतो याकडे लक्ष आहे. या बैठकीत मागण्या मान्य झाल्या तर कांदा व्यापारी लिलावात सहभागी होतील, अन्यथा बेमुदत संपात सहभागी होणार असल्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. दुसरीकडे आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बैठक पार पडली. त्यामुळे उद्याची बैठक कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महत्वाची असणार आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik News : नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्न जैसे थे, उद्या लासलगावमध्ये शेतकरी संघटनेची महत्वपूर्ण बैठक, शेतकऱ्यांचे नुकसान