नाशिक : ड्रग तस्कर ललित पाटीलचे (Lalit Patil) प्रकरण राज्यभरात गाजत असताना आता नाशिकमधून (Nashik) मोठी अपडेट या संदर्भात आली आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलचा नाशिकस्थित असलेला ड्रग्ज निर्मितीचा कारखानाच उध्वस्त करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली असून नाशिक शहर पोलिसांच्या हद्दीत कोट्यवधींच ड्रग्ज (drugs) सापडल्याने खळबळ उडाली आहे. 


काही दिवसांपूर्वीच ड्रग्ज माफिया ललित पाटील (lalit Patil Pune) पुण्यातील ससून रुग्णालयातुन पोलिसांच्या हाती तुरी देऊन फरार झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर ड्रग्ज विरोधी कारवाईसाठी पोलीस ॲक्शन मोडवर आले असून याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ललित पाटील हा मूळचा नाशिकचा (Nashik) असून तो फरार झाल्यानंतर नाशिकच्या घरी देखील पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात येत होती. या माध्यमातून साकीनाका पोलिसांचा तपास सुरु असताना धक्कादायक माहिती समोर आली असून तब्बल तीन दिवसांच्या कारवाईतून नाशिकमध्येच ड्रग्ज बनविण्याचा कारखाना असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. नाशिकमधील श्री गणेशाय इंडस्ट्रीज या कंपनीत ड्रग्ज बनविण्याचे काम सुरु होते. विशेष म्हणजे नाशिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून ड्रग्ज निर्मिती सुरू होती, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


दरम्यान साकीनाका पोलिसांकडून (Mumbai Police) तीन दिवस कारवाई सुरु होती. यात ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील (bhushan Patil) हाच नाशिकमध्ये श्री गणेशाय इंडस्ट्रीजच्या नावाने ड्रग्ज निर्मिती करत असल्याचे समोर आले. या कारवाईत मुंबई पोलिसांना ड्रग बनविण्याचा दीडशेहुन अधिक किलोचा कच्चा माल सापडला असून पोलिसांनी हा कारखानाच उद्धवस्त केला आहे. या प्रकरणी कंपनी मालकासह कामगारांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईनंतर राज्यातील ड्रग्जचं मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये मागील काही महिन्यात ड्रग्ज सापडल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या होत्या. त्यामुळे याच कारखान्यातून ड्रग्जचा पुरवठा होत होता कि काय असा सवाल उपस्थित होतो आहे. 



ललितला भावाची साथ...


पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रॅग्स रॅकेट चालवणारा (Pune Crime News)  ड्रॅग माफिया ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून पळून आहे. सध्या त्याला शोधण्यासाठी विविध पथके रवाना झाली आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून ललित पाटील हा ससून रुग्णालयात वेगवगेळ्या आजारावर उपचार घेत असल्याने या निमित्ताने समोर आले. विशेष म्हणजे ललित पाटील हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील असून भूषण पाटील हा त्याचा भाऊ त्याला साथ देत असल्याचं उघड झालं आहे. त्यातच आज ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याचा नाशिकमध्येच ड्रग्ज निर्मितीचा कारखाना असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी हा कारखाना उध्वस्त केला आहे. 


 महत्वाच्या बातमी : 


Sasoon Hospital Drug Racket Pune : ललित पाटील ससूनमधून ड्रॅग्स रॅकेट कसं चालवत होता आणि पळून जाण्यात कसा यशस्वी झाला ?