पुणे : ड्रग माफिया ललित पाटील (Lalit Patil) हा पोलिसांना धक्का देऊन (sasoon hospital drug racket) पळून गेल्याचा दावा पुणे पोलिसांकडून करण्यात आला. मात्र या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ललित पाटील हा आरामात चालत जाताना दिसतो आहे आणि त्याहून गंभीर बाब म्हणजे ललित पाटील ससूनमधून निघाल्यानंतर कुठे लांब पळून गेला नाही तर काहीच अंतरावर असलेल्या लेमन ट्री या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्याच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.  ललित पाटीलप्रमाणे गंभीर गुन्ह्यातील अनेक कैदी महिनोंमहिने ससूनमध्ये तळ ठोकून असल्याचं समोर आलं आहे.  त्यामुळे पोलिसांवर करावाई तर झाली पण आता सासूनमधल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?असा प्रश्न विचारला जात आहे.


ललित पाटील पळून गेला की पळवलं?


ललित पाटीलला टीबीचा रुग्ण म्हणून जून महिन्यात ससून रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्याला पोटाचा अल्सर झाल्याचं कारण देत त्याचा रुग्णालयातील मुक्काम डॉक्टरांनी आणखी वाढवला. मात्र जेव्हा तो चालवत असलेलं ड्रग रॅकेट उघडकीस आलं तेव्हा अचानक त्याच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, असा अहवाल ससूनमधील डॉक्टरांनी दिला आणि त्यासाठी एक्स रे काढण्यासाठी नेलं जात असताना साडेसात वाजता ललित पाटील पळून गेल्याच सांगण्यात आलं. पण ससूनमधून निसटलेला ललित पाटील कुठे लांब पळून गेला नाही तर रिक्षात बसून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या लेमन ट्री या पंचतारांकित हॉटेलमध्ये तो पोहचला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ललित पाटील लेमन ट्री हॉटेलच्या पायऱ्या चढून जाताना दिसत आहे.  


साडेसात वाजता ससूनमधून निसटलेला ललित पाटील सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी निर्धास्तपणे लेमन ट्री हॉटेलच्या पायऱ्या चढताना दिसतो आहे. त्यानंतर एका तासांनी म्हणजे आठ वाजून पन्नास मिनिटांनी पोलिसांचं एक पथकही इथं पोहचलं. पण त्यांना ललित पाटील का सापडला नाही?  तो इथे का आला होता? हे त्याचं आश्रयस्थान होतं का?  अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पुणे  पोलीस देणार का?, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 


ससूनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर शांत का?


विशेष म्हणजे ललित पाटीलवर या ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्याच अखत्यारीत असलेल्या वॉर्डमध्ये ऑपरेशन होणार होते. त्याच्यावर इतक्या तातडीने ऑपरेशन करण्याची शिफारस कोणत्या डॉक्टरांनी केली होती? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत . मात्र ससूनच्या डीन डॉक्टर संजीव ठाकूर याबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत. तर तिकडे येरवडा कारागृहातील असे कोणते डॉक्टर आणि अधिकारी आहेत ज्यांनी ललित पाटीलवार उपचार करण्याची आणि त्यासाठी त्याला तब्ब्ल चार महिने ससूनमध्ये राहण्याची परवानगी दिली, याची चौकशी होण्याची गरज आहे. एकीकडे गंभीर गुन्ह्यातील आरोपींना ससूनमध्ये पंचतारांकित सुविधा मिळत असताना सामान्यांना मात्र इथं वाली उरलेला नसल्याचं दिसत आहे.


ललित पाटीलला शोधण्यासाठी दहा पथकं रवाना



ललित पाटीलला शोधण्यासाठी दहा पथकं रवाना करण्यात आली आहेत. तर नऊ पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे.  पण फक्त अधिकाऱ्यांवर याच खापर फोडून भागणार नाही आहे. ड्रग तस्करी प्रकरणात अटक केलेला ड्रग माफिया पोलिसांच्या पहाऱ्यात बसून पुन्हा ड्रग रॅकेट चालवत असले आणि सापडला गेल्यावर अगदी आरामात पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहचत असेल तर सरकारचा पोलीस आणि आरोग्य यंत्रणेवरती वचक उरलाय का? असा प्रश्न विचारला जायला हवा. 


इतर महत्वाची बातमी-


Pune : ससून रुग्णालयातील ड्रग्ज माफिया ललिल पाटील खरंच पळाला की त्याला पळवला? CCTV फुटेजमधून धक्कादायक माहिती समोर