नाशिक : नाशिक (Nashik) जिल्हा कांद्याची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते, लाखो शेतकरी कांद्याचे (Onion Farming) उत्पादन घेत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून कांदा दर आणि निर्यात शुल्कावरून शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याने अनुदानापोटी 39 हजार रुपये मिळणे अपेक्षित असताना केवळ 250 रुपये 50 पैसे अनुदान (Grant) मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले असून सरकारने शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच लावली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
गेल्या महिन्यात कांदा प्रश्न नाशिक जिल्ह्यात (Nashik District) चांगलाच पेटला होता. अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावरून उतरून सरकारविरोधात आंदोलने केली. त्यानंतर सरकारने नाफेडच्या माध्यमातून करण्याचा कांदा खरेदीचा (NAFED) निर्णय घेतला खरा, मात्र तो सुद्धा बारगळल्यात जमा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशातच सरकारने कांदा अनुदान (Onion Grant) वाटपास सुरवात केली. मात्र यातही शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचा प्रकार नुकताच नाशिकमध्ये समोर आला आहे. नाशिकच्या मालेगाव येथील चिंचावड गावातील एका शेतकऱ्याने 112 क्विंटल 90 किलो लाल कांदा विक्री केला. मात्र त्यांच्या खात्यावर कांदा अनुदानापोटी अवघे 252 रुपये 50 पैसे वर्ग झाले. त्यामुळे शासनाने एकप्रकारे या शेतकऱ्याची चेष्टाच केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शासनाने कांदा अनुदानाचा पहिला हप्ता पाठवला, त्यात शेतकऱ्याला केवळ 252 रुपये 50 पैसे अनुदान मिळाले तर अजूनही अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहे.
नाशिकच्या मालेगाव (Malegaon) तालुक्यातील चिंचावड गावातील शेतकरी सतीश गुंजाळ यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. शेतात काबाड कष्ट करत घाम गाळून त्यांनी दोन एकरात खरिपाच्या लाल कांद्याचे पीक घेतले. त्यांच्या कांदा उत्पादनाला उमराणा बाजार समितीमध्ये कवडीमोल भाव मिळाला. मात्र राज्य शासनाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अत्यल्प भावात कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकरी कांदा कवडीमोल भावात विकल्या गेल्याचे दुःख बाजूला सारून आशेने कांदा अनुदानाची वाट बघू लागला. शेतकरी गुंजाळ यांनी 112 क्विंटल 90 किलो कांदा विक्री केला होता. त्यानुसार त्यांना 39 हजार रुपये अनुदान मिळणे अपेक्षित होते. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये कांदा अनुदानाचे पैसे मिळणार असल्याने गुंजाळ हे आनंदित होते. शासनाचा अनुदानाचा पहिला दहा हजार रुपयांचा हफ्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली..मात्र दहा हजार तर सोडाच गुंजाळ यांच्या बँक खात्यावर कांदा अनुदानापोटी अवघे 252 रुपये 50 पैसे जमा झाले. खात्यातील रक्कम बघून शेतकरी गुंजाळ यांना धक्काच बसला..252.50 पैसे खात्यात वर्ग करून शासनाने त्यांची एकप्रकारे चेष्टाच केली..
शेतकऱ्याची चेष्टा करू नका, पाठीराखे व्हा....
दरम्यान कांदा अनुदानाची 252.50 पैसे ही रक्कम नेमकी कशाच्या आधारे वर्ग केली. या विवंचनेत सध्या शेतकरी गुंजाळ असून याबाबत बाजार समिती प्रशासन यांनी चौकशी करावी व अनुदान मिळावे अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे याच भागातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर कांदा आनुदानाचा एक रुपयाही जमा न झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळ, शेतमालाला भाव नाही अशा अनेक अस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी सध्या सापडलेला असतांना शासनाने अनुदान देण्याची घोषणा केली अन् 252.50 पैसे खात्यावर पाठवून एकप्रकारे शेतकऱ्याची चेष्टाच केली आहे. मायबाप सरकार. शेतकऱ्याची चेष्टा करू नका, तर त्याचे पाठीराखे व्हा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
इतर महत्वाची बातमी :