नाशिक : मराठा आरक्षणासाठी गावबंदीचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरले असून एकट्या नाशिक जिल्ह्यातून पाचशेहून अधिक गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केल्याचे सकल मराठा समाज आंदोलकांकडून सांगण्यात आले आहे. तर जवळपास तीनशेहून अधिक पाठींब्याचे पत्रही आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हळूहळू हे लोण संपूर्ण जिल्ह्यात पसरले असून सकल मराठा समाज बांधव आता आरक्षणासाठी पेटून उठल्याचे दिसून येत आहे. 


मराठा आरक्षण आंदोलन राज्यभरात आक्रमक होत असून सकल मराठा समाज बांधव देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर संपूर्ण राज्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत असून नाशिकमध्ये देखील गावबंदीचे लोण पसरले आहे. सुरवातीला एका गावाने नंतर दुसऱ्या, मग तिसऱ्या हळूहळू संपूर्ण जिल्ह्यातच गावबंदी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील 500 हून अधिक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली असून ही संख्या दिवसागणिक वाढत असल्याचा दावा सकल मराठा समाजाने केला आहे. 


नाशिकमध्ये गेल्या 45 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरु असून मनोज जरांगे पाटील हे नाशिक दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. अनेक ग्रामपंचायती तसेच विविध जाती समुदायांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ पत्र दिले आहे, तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील साडेपाचशेहून अधिक गावात गावांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू केले होते. त्याला प्रतिसाद वाढत असून, आता गाव बंदी करण्याची मोहीम सुरू झाली आहे. आतापर्यंत पाचशे गावांमध्ये गावबंदीचा ठराव झाल्याची माहिती राम खुर्दळ यांनी दिली. तर मराठा आरक्षणप्रश्नी व्यापक जनजागृतीसाठी रविवारपासून गावोगावी बैठकांचे सत्र राबविले जाणार आहे. या आंदोलनात लोकसहभाग वाढविला जाणार प्रत्येकाला शक्य आहे, त्या मार्गाने सहभागी व्हावे असे आवाहन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 


 गावोगावी मराठा समाजाशी चर्चा करणार


सकल मराठा समाजाच्या वतीने येथील जिल्हा न्यायालयासमोर शिवतीर्थावर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा 45 वा दिवस आहे. रविवारपासून आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते गावोगावी मराठा समाजाशी चर्चा करणार आहेत. व्यापक जनजागृतीद्वारे आंदोलनात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनात दररोज विविध संस्था, ग्रामस्थ, विविध समुदायांतील मंडळी थेट भेट देऊन समाजाच्या आरक्षणास लेखी पाठिंबा देत आहेत. आतापर्यंत 300 हून अधिक पाठिंब्याची पत्रे उपोषणकर्त्यांना प्राप्त झाली आहेत. ही सर्व पत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनासोबत पाठविली जाणार आहेत. मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी लढत आहे. मात्र निष्क्रिय आमदार, खासदार, मंत्री व आजवरच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. आता हा निर्वाणीचा लढा असल्याचे उपोषणकर्त्यानी म्हटले आहे. सध्या गावोगावी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचे फलक झळकत आहेत. 


इतर महत्वाची बातमी : 


Rohit Pawar : रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा स्थगित, मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी घेतला निर्णय