नाशिक : नवरात्रीचा उत्सव (Navratri) उद्यापासून सुरु होत आहे. यासाठी महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रसिद्ध देवी मंदिराच्या ठिकाणाहून अखंड ज्योत आणण्याची परंपरा आजही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील देवी भक्त नाशिकच्या वणी गडावरून अखंड ज्योत नेण्यांसाठी दाखल होत असून त्यामुळे सप्तशृंगी देवी मंदिर (saptshrungi Devi Mandir) भाविकांनी गजबजलं आहे. अनवाणी पायाने त्या मंदिरापर्यंत गावापर्यंत ज्योत नेऊन घटस्थापना केली जाते. 


साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नाशिकच्या (Nashik) वणी येथील सप्तशृंगी देवी मंदिर (Saptshrungi Gad) नवरात्रीसाठी सज्ज झाले आहे. वर्षभर या गडावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र नवरात्रीचा हा उत्साह अधिक दिसून येतो. दर्शनासाठी भाविक येतच असतात. मात्र दुसरीकडे नवरात्रीच्या पाच सहा दिवस आधीपासून महाराष्ट्रातील घटस्थापना (Navratri) करणारे मित्रमंडळ वणी गडावर येत अखंड ज्योत घेऊन जात असतात. याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून गडावर ज्योत नेणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असून गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकते प्रचंड संख्येने वाजत गाजत सप्तशृंगीचा उदोउदोचा गजर करत सप्तशृंगी गडावर दाखल होत आहेत.


शारदीय नवरात्रोत्सवास (Navratri 2023) उद्या रविवार पासून प्रारंभ होत असल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह खान्देशमधील भाविक गडावर दाखल होत आहेत. सप्तशृंगगडावरून मशालीद्वारे ज्योत आपापल्या गावी कोणतीही पादत्राणे न घालता घेऊन जाण्याची परंपरा आहे. यात मालेगाव, धुळे, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, जामनेर या भागातील भाविकांचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळीही त्यांचा पायी प्रवास सुरू असतो. नवरात्रोत्सवास रविवारपासून प्रारंभ होत असल्याने घटस्थापनेच्या अखंड दिव्यासाठी सप्तशृंगीदेवीच्या गडावरील ज्योतीला विशेष महत्त्व आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी दोन-तीन दिवस अगोदरपासून भाविक गडावरील अखंड ज्योत मशालीच्या सहाय्याने आपल्या गावी घेऊन जातात. सप्तशृंगी देवीच्या मंदिरातून ज्योत प्रज्वलित करुन नेण्यासाठी सध्या वणी गड गजबजला आहे.


काय आहे ही परंपरा?


नवरात्रोत्सव मंडळे घटस्थापनेपूर्वी मंदिरात येऊन भोगीपूजा करुन आणि भवानी ज्योत प्रज्वलित करुन गावी नेत असतात. अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही कायम आहे. सुरवातीला ज्या गावातील मंडळ असेल अशा ठिकाणाहून वाहनाद्वारे देवीच्या मंदिरात पोहचले जाते. या ठिकाणी ज्योत घेण्यासाठी मंदिरात पूजा करून ही ज्योत पेटवली जाते. यानंतर जो ज्योत घेणारा असतो, तो अनवाणी पायाने गड उतरून गावी मार्गक्रमण करत असतो. अशावेळी मंडळातील अनेक कार्यकर्ते त्याच्यासोबत असतात. त्यानंतर पहिल्या भाविकाने ज्योत घेतल्यानंतर तो काही किलोमीटर चालल्यानंतर दुसरा भाविक ज्योत घेऊन चालत असतो. रस्त्यात कुठेही थांबले जात नाही. त्याचबरोबर या प्रवासात ज्योत कुठेही विझू दिली जात नाही. ज्योत हळूहळू एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशी जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया चालूच असते. शेवटी ज्योत गावात आणल्यानंतर विधिवत घटस्थापना करून ज्योत उभी केली जाते. ती नऊ दिवस विझू दिली जात नाही. दिवसरात्र ज्योतीत तेल टाकून निरंतर पेटवली जाते. 


इतर महत्वाची बातमी : 


Navratri 2023: नवरात्रीत देवीची अखंड ज्योत कोठे आणि कोणत्या दिशेला लावावी? वास्तुशास्त्रात म्हटंलय...