नाशिक : दिवाळीच्या (Diwali 2023) सणानिमित्त घर जाण्याची ओढ लागलेली असून, गावी जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र याच गर्दीचा फायदा काही खासगी वाहतूकदारांकडून (Private Tour) घेतला जात आहे. एकीकडे एसटी बसेसला असणारी गर्दी आणि दुसरीकडे खासगी वाहतुकदारांकडून अव्वाच्या सव्वा प्रवाशी भाडे आकारले जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक वाहतूक पोलीस (Nashik Police) शाखेकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला असून, काही तक्रारी असल्यास संबंधित क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


राज्यभरात दिवाळी सणाची (diwali) लगबग सुरु असून सर्वदूर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गावाकडून शहरात वास्तव्यास आलेल्या, तसेच महिला माहेरला दिवाळी सणांनिमित्त गावाकडे जात असते. त्याचबरोबर सुट्ट्यांचा (Diwali Holidays) काळ असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यंदा एसटी महामंडळाने प्रवाशी भाड्यात दहा टक्के वाढ केली. मात्र तरीदेखील एसटीने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. दुसरीकडे बसेसला गर्दी असल्याने अनेक प्रवाशी खासगी वाहतुकीचा आधार घेत आहेत. मात्र याचाच फायदा घेऊन खासगी वाहतूक करणारे वाहनचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करत आहेत.


या पार्श्वभूमीवर प्रवाशांना येणाऱ्या अडचणींच्या तक्रारीसाठी 0253-222005 या हेल्पलाइन क्रमांकावर (Helpline Number) किंवा rto15-mh@gov.in या इ-मेल आयडीवर संपर्क साधावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच शासन निर्णयानुसार निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने भाडे आकारणी केल्यास देखील प्रवाशांनी तक्रार करावी असेही सांगण्यात आले आहे. खासगी प्रवासी बस व वाहनांनी निश्चित केलेल्या दरानुसारच भाडे आकारणी करावी, नियमाचे पालन करावे असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. 


जादा भाडे घेतल्यास इथं तक्रार करा.... 


दिवाळी सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून नाशिक शहरातील सीबीएस, ठक्कर बसस्थानकावर प्रचंड गर्दी झाली आहे. यात नाशिक शहरातून प्रामुख्याने धुळे, खान्देश, पुणे, मुंबईकडे जाणारे प्रवासी अधिक आहेत. जादा बसेस उपलब्ध करूनही प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे. तसेच रेल्वेचेही तिकीट आरक्षण फुल झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. याचाच फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून तिकीट दरात दुप्पट ते तिप्पटीने अधिक घेतले जात असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. एसटी महामंडळाच्या विविध संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेण्यात आले आहे. त्यानुसार खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या त्या संवर्गातील संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति-किलोमीटर भाडे दराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत.


इतर महत्वाची बातमी : 


ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, कर्मचारी-अधिकाऱ्यांना 6000 रुपयांचा बोनस जाहीर