नाशिक :  दिवाळी (Diwali) सणाला गोपूजनाने सुरवात झाल्यानंतर सर्वदूर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. घरोघरी दिवाळी सणाची (Diwali 2023) लगबग सुरू असून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील बाजारपेठा फुलल्या असून नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र आहे. 


आकाश कंदील, नवे कपडे, फराळ, फटाक्यांची आतिषबाजी असा सगळा माहोल म्हणजे दिवाळीचा सण होय. दिवाळी सणांच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाचे सध्या राज्यभरात असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या आहेत. तसेच नागरिकांची देखील खरेदीसाठी झुंबड असून यंदा लाखोंची उलाढाल होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या मेनरोड परिसरात नागरिक कपडे खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तसेच धुळ्याच्या आग्रा रोड भागात बाजारपेठ सजली असून आकाश कंदील पणत्या लक्ष्मीच्या मूर्ती पूजेचे साहित्य असे विविध वस्तू विक्रीसाठी दाखल झाले असून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. तर अहमदनगर शहरात बाजारपेठा फुलल्या असताना कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. 


नाशिकच्या मेनरोडला गर्दी 


दरम्यान रविवारी लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan) असल्याने दिवाळीनिमित्त खरेदीची लगबग सुरू झाली आहे. अनेकांचे वेतन जमा झाल्याने आणि रविवारची सुटी असल्याने नागरिकांनी सहकुटुंब खरेदीसाठी शहरातील विविध बाजारपेठांमध्ये तसेच मॉलमध्ये गर्दी केली होती. नाशिक (Nashik Diwali) शहरातील मेनरोड येथील बाजारपेठ सकाळपासूनच नागरिकांच्या गर्दीने फुलली होती. दुकानदारांसह छोट्या विक्रेत्यांकडे खरेदीदारांची गर्दी पाहावयास मिळाली. यात कपडे, आकाशकंदील, फटाके, भेटवस्तू, चपलांसह महिला वर्गाकडून फराळाचे साहित्य, खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी गर्दी पाहावयास मिळाली. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनीही खरेदीवर सूट दिल्याचे दिसून आले. 


धुळे शहरातील बाजारपेठा सजल्या, लाखो रुपयांची उलाढाल


दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धुळे (Dhule) शहरातील बाजारपेठा सजल्या असून नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाली आहे. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण अनुभवास मिळत आहे. धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोड भागात बाजारपेठ सजली असून आकाश कंदील पणत्या लक्ष्मीच्या मूर्ती पूजेचे साहित्य असे विविध वस्तू विक्रीसाठी दाखल झाले असून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. तसेच नवीन कपडे घेण्यासाठी आणि सोने खरेदी करण्यासाठी देखील नागरिकांची गर्दी झाली असून यातून लाखो रुपयांचे उलाढाल बाजारपेठेत होत आहे. दिवाळीत आकाश कंदीलला विशेष महत्त्व असते. बाजारात शंभर रुपयांपासून ते तीन हजाररुपयांपर्यंत आकाश कंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. 


अहमदनगर : कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी


दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा विविध साहित्याने फुलल्या आहेत. त्यातच सण-उत्सवात फुलांना प्रचंड मागणी असते. मात्र दसरा सणाला झेंडू-शेवंती फुलांना अतिशय कमी मागणी होती, तर दर देखील उतरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अक्षरशः फुलं रस्त्यावर फेकून दिले होते. दिवाळीत देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे झेंडूला 30 ते 40 रुपये किलो भाव आहे तर शेवंतीचे दर घसरले असून 50 ते 60 रुपये दर मिळत असल्याचे व्यापारी सांगत आहे. सध्या मार्केटमध्ये कृत्रिम फुलांची मागणी देखील वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फुलांना काही भाव मिळत नाही, म्हणून कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी शेतकरी करत आहेत. तर कृत्रिम फुलं वारंवार वापरात येत असल्याने ग्राहकांचा कल या फुलांकडे असल्याचे व्यापारी सांगतात. तर खऱ्या फुलांचा मान हा पूजेमध्ये आणि मंदिरात असल्याने कृत्रिम फुलांमुळे खऱ्या फुलांच्या दरावर परिणाम होत नसल्याचा दावा व्यापारी करत आहेत.


जळगावमध्ये सोने खरेदीसाठी गर्दी 


हिंदू धर्मियांमध्ये दिवाळीचा सण हा सर्वात मोठा आणि महत्वाचा मानला जातो. हा सण शुभ मानला जात असल्याने या काळात विविध वस्तूंची खरेदी करून धनत्रयोदशीच्या दिवशी पूजन केले जात असते. जळगाव सुवर्णनगरीत धनत्रयोदशीच्या दिवशी मुहूर्त सोन्याच्या आणि चांदीच्या खरेदीचा मुहूर्त मानला जात जातो. म्हणूनच या दिवशी अनेकजण सोन्याचांदीचे दागिने खरेदी करत असतात. आज सकाळपासूनच ग्राहकांनी सोन्या चांदीचे दागिने खरेदी करून मुहूर्त साधण्याचा प्रयत्न केला आहे. धनत्रयोदशी निमित्ताने सोने चांदी खरेदी ही शुभ असते. त्यामुळे सोन्याचे दर काहीही असले तरी आजच्या मुहूर्तावर सोने खरेदी करत असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत. 



इतर महत्वाची बातमी : 


Diwali 2023 : ऐन दिवाळीत बनावट मिठाईचा सुळसुळाट; भेसळयुक्त मिठाई कशी ओळखायची?