मुंबई : एसटी (ST) कर्मचारी आणि अधिकारी यांना सरसकट 6000 रुपयांचा सानुग्रह बोनस (Bonus) जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता गोड होणार असल्याचं म्हटलं जातंय. मंंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात माहिती दिलीये. मागील अनेक महिन्यांपासून तोट्यात असणाऱ्या एसटीची आर्थिक स्थिती काही प्रमाणात सुधारत असल्याचं चित्र आहे. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील शासनाकडून घेण्यात आले आहेत. तसेच एसटी महामंडळास स्व-मालकीच्या गाड्या खरेदी करण्यासाठी यंदाच्या वर्षी 900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीये. 


मंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार खात्याअंतर्गत बढतीसाठी आवश्यक असणारी 240 दिवसांची अट रद्द होईपर्यंत सदर बढतीस स्थगिती देण्यात येईल. त्याचप्रमाणे सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याकरिता 30 नोव्हेंबर 2023 पूर्वी सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाशी बैठक घेऊन निर्णय देण्यात येईल. 


बैठकीत महत्त्वाचे कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? 


या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आलीये. कॅशलेस मेडिक्लेम योजनेसाठी तालुका आणि जिल्हास्तरावर रुग्णालयांची निवड करण्यात येईल. या रुग्णालयामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची बिले महामंडळ देय करणार आहे. त्याचप्रमाणे घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वेतन वाढीचा दराची थकबाकीबाबत 30 नोव्हेंबरपूर्वी निर्णय घेण्यात येईल.  


एसटी कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोग लागू करण्याची मागणी


दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी बंदची हाक दिली होती. परंतु त्यांच्या या हाकेला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं चित्र होतं.  मात्र  आंदोलनावर भाष्य करताना सदावर्ते म्हणाले, आंदोलन सुरू करण्याआधी या सरकारने आम्हाला चर्चेसाठी बोलवलंय. त्याचप्रमाणे या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आणि कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु तो दावाही फोल ठरल्याचं पाहायला मिळालं. 


 जवळपास दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उत्सफुर्त संपात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. पण आता एसटी कर्मचाऱ्यांबाबत अनेक सकारात्मक निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे यंदाची एसटी कर्मचाऱ्यांची दिवळी गोड होणार असल्याचं म्हटलं जातंय. 


हेही वाचा : 


शेतकरी हवालदिल, पाणी टंचाईसह चारा टंचाई, नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, पालकमंत्री दादा भुसे यांची मागणी